नारायणगाव : शिवनेरी शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे चित्र

नारायणगाव : शिवनेरी शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे चित्र
संजय थोरवे

नारायणगाव :
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर पक्ष उभारणीसाठीचा पहिला दौरा जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी शिवनेरीपासून शिवरायांची राजधानी रायगडपर्यंत दौरा करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर जुन्नरचा कानोसा घेतला असता शिवनेरी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसले. राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जुन्नर तालुक्यात आहे.
आमदार वल्लभ बेनके 1985 साली जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हापासून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. त्या वेळी बेनके यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासकामे केली. तालुक्यात बांधण्यात आलेली माणिकडोह, पिंपळगाव, वडज, येडगाव सारखी धरणे, कालवे, बंधारे करून तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी बँक,जिल्हा दूध संघ यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करून अनेक विकासकामे केली. बेनके कुटुंबीयांवर शरद पवार यांची कायम कृपादृष्टी राहिली असून, तब्बल 8 वेळा विधानसभेची संधी त्यांना देण्यात येऊन वल्लभ बेनके हे चार वेळा आमदारकीला निवडून आले, तर त्यांचे पुत्र अतुल बेनके एकदा, अतुल बेनके यांनाही शरद पवार यांनीच उमेदवारी दिली होती.
सहकार क्षेत्रात कै. शिवाजीराव काळे यांनीही शरद पवार यांच्या माध्यमातून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करून शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे तालुक्यातील जनता आजही शरद पवार यांच्या विचाराला मानणारी असून, त्यांच्या मागे उभी राहणारी आहे. रविवारी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कोणते आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत हे वृत्तवाहिनीवरून दाखवताना अतुल बेनके हे त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत  बेनके यांनी  शरद पवार व अजित पवार हे दोन्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते असून, अजित पवार हे आमचे विधिमंडळ पक्षनेते आहेत. त्यांनी आम्हाला फोन करून मुंबईत  बोलावले.
मात्र, आम्हाला शपथविधी होणार याबाबत कुठलीही कल्पना दिली नव्हती असे स्पष्ट केले. जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका आमदार अतुल बेनके यांनी घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यावर म्हणाले की,  शरद पवार हे माझे राजकीय दैवत आहेत, तर अजित पवार हे माझे नेते आहेत, त्यामुळे निर्णय हा सर्वांना विचारात घेऊन घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी मी राष्ट्रवादी पक्षाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्षातच राहणार अशी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कृषिरत्न अनिल मेहर यांनी शरद पवार यांच्या सहकार्‍याने जुन्नर तालुक्याचा विकास झाला आहे ही बाब संघटनात्मक आहे, त्यामुळे त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, तर जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे यांनी मी शरद पवार यांच्यासोबत आहे व आमदार अतुल बेनकेसुध्दा शरद पवार यांच्या सोबतच येतील, असे सांगितले; त्यामुळे तालुक्यातील एकूणच चित्र अस्पष्ट असून, आमदार अतुल बेनके काय निर्णय घेतील यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनीही  राजकारणामध्ये नैतिकता फार महत्त्वाची बाब आहे.  शरद पवार ही एक विचारधारा आहे. जनतेने मला एका विशिष्ट विचारधारेचा विचार करून निवडून दिले आहे व त्या विचारधारेचा अनादर करणे योग्य वाटत नाही त्यामुळे मी शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news