शपथविधीने बारामतीत ‘थोडी खुशी, थोडा गम’ | पुढारी

शपथविधीने बारामतीत ‘थोडी खुशी, थोडा गम’

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि त्यांचे सहकारी सहभागी होत त्यांनी शपथ घेतल्याने बारामतीत ‘थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण पाहायला मिळाले. बारामती विधानसभा मतदारसंघाचे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रतिनिधित्व करणार्‍या अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे बारामतीत पक्षाला धक्का बसला आहे. परंतु, बारामतीत अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

बारामतीत पक्षाने यासंबंधी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही तसेच बारामतीत झालेल्या जल्लोषात पक्षाचे प्रमिख पदाधिकारी सहभागी नसल्याचे दिसून आले. पक्षाचे काही माजी नगरसेवक व काही कार्यकर्त्यांनी येथील भिगवण चौकात फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक अभिजित काळे, सुधाकर माने, जितेंद्र काटे यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांनी तीन वर्षांत तिसर्‍यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राजकारणातील हा भूकंप बारामतीकरांना अचंबित करणारा ठरला आहे. पवार यांनी शपथ घेतल्यानंतरही शहर राष्ट्रवादी भवनामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकामध्ये ‘अजितदादा, आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. याबाबत माजी नगरसेवक नीलेश इंगुले म्हणाले की, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, याचा आम्हा बारामतीकरांना मोठा आनंद झाला आहे. यामुळे बारामतीलाच नव्हे, तर राज्याला पुन्हा चांगले दिवस येतील. सर्वांचा विकास होईल. अजितदादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील, तो पक्ष मोठा होणार, हे निश्चित.

दरम्यान, अजित पवार हे भाजप-सेना सरकारमध्ये जाणार असल्याच्या मुद्द्यावर 25 जून रोजी बारामतीत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 25 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामतीत आले होते. या दिवशी सकाळी साडेदहाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे बारामतीत गोविंदबागेत आगमन झाले. तेथे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती.

त्यानंतर बारामतीतील विकासकामांच्या पाहणीनिमित्त अजित पवार व किरण गुजर हे एकाच गाडीतून निघून गेले होते. त्यानंतर पुन्हा दुपारी 2 ते 5 या वेळेत विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार व गुजर यांची बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्चेनंतर शरद पवार हे गुजर यांच्यासमवेत कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. याच दिवशी यासंबंधी सगळी चर्चा झाली होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा

पुणे : चार टोळ्यांतील 10 चोरांना अटक तीन अल्पवयीन साथीदारही ताब्यात

इंदापूर : आ. भरणे भाजपबरोबर; हर्षवर्धन पाटलांचे ‘टेन्शन’ वाढले

वळसे-पाटलांनी शरद पवारांना सोडल्याने अनेकांना धक्का

Back to top button