इंदापूर : आ. भरणे भाजपबरोबर; हर्षवर्धन पाटलांचे ‘टेन्शन’ वाढले | पुढारी

इंदापूर : आ. भरणे भाजपबरोबर; हर्षवर्धन पाटलांचे ‘टेन्शन’ वाढले

जावेद मुलाणी

इंदापूर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांमध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा समावेश असल्याने इंदापूर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात सुरू असलेले राजकीय वैर कसे शमणार? असा प्रश्न भाजपमध्ये निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय हाडवैर सर्व राज्याला परिचित आहे. एकाच सरकारमध्ये काम करताना देखील यांच्यातील हाडवैर सातत्याने राज्याने अनुभवले आहे. याच राजकीय हाडवैरातून त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना राजकीय रसद पुरवून हर्षवर्धन पाटील यांचा दोनवेळा विधानसभेला पराभव घडवून आणला.

पवार यांच्या राजकीय खेळीला वैतागून त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करून पवारांना खुलेआम विरोध करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर आता पवार यांनीच भाजपबरोबर संधान साधल्याने पुन्हा अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर कसे असणार? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व ठेवण्यासाठी अजित पवार त्यांच्या मर्जीतील लोकांना राजकीय ताकद पुरवतील, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेतच, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील भरणे यांच्यावर लोभ आहे. हे 2014 मधील भाजप सरकारच्या काळात लक्षात आले होते. आमदार भरणे हे विरोधातील आमदार असताना देखील कोट्यवधी रुपये निधी त्यांनी त्या वेळी आमदार भरणे यांना दिला होता. आता तर अजित पवार यांच्या माध्यमातून भरणे इंदापूरसाठी मोठा निधी आणणार, हे नक्की झाले आहे.

हर्षवर्धन पाटील हे 2019 च्या विधानसभेला भाजपबरोबर गेल्यानंतर त्यांना भाजपमधून पाहिजे त्या प्रमाणात रसद मिळाली नाही. सुरुवातीची अडीच वर्षे विरोधातील सरकार असल्याने त्यांना भाजपमध्ये प्रवेशाचा काहीच फायदा झाला नाही, त्यानंतर मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर इंदापूरच्या विकासकामांना निधी आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या हालचाली सुरू झाल्या, त्यानंतर निधीचा ओघ सुरू असतानाच आता पवार यांच्याबरोबर आमदार भरणे हेदेखील सत्तेत सहभागी झाल्याने या सत्तेतील निधीचा फायदा आमदार म्हणून भरणे यांनाच होणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या पारड्यात आता नेमके काय पडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा

नगर : मैत्रेय कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक

कराडात शरद पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Back to top button