पुणे : चार टोळ्यांतील 10 चोरांना अटक तीन अल्पवयीन साथीदारही ताब्यात | पुढारी

पुणे : चार टोळ्यांतील 10 चोरांना अटक तीन अल्पवयीन साथीदारही ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर भागात चोरी करणार्‍या चार टोळीतील चोरट्यांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी दहा चोरट्यांना अटक केली असून, तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांनी आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्वप्निल केंदळे, अमोल शेलार (दोघे मूळ रा. नेवासा, अहमदनगर), अमर कांबळे (रा. हडपसर) तसेच विजय देडगावकर (वय 63, रा. नगर) यांना चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. केंदळे, शेलार आणि कांबळे यांनी सोनसाखळी हिसकाविण्याचे गुन्हे केले असून, त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची विक्री देडगावकर यांना केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी चोरीच्या आणखी एका गुन्ह्यात अजय मौजन (वय 20, रा. केसनंद गाव), यतीन पाटील (वय 21, रा. कोंढापुरी) यांना रांजणगाव येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दुचाकी आणि मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अथर्व शेंडगे (वय 18, रा. पर्वती), प्रणव ढावरे (वय 18, रा. अप्पर इंदिरानगर) यांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींकडून तीन दुचाकी आणि दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले. शेवाळवाडी भागात दुकान फोडणार्‍या गौरव अडसुळे (वय 19, रा. शेवाळवाडी), रवी हजारे (वय 19, रा. शेवाळवाडी), नयन भोसले (वय 20) यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, समीर पांडुळे, शाहिद शेख, अतुल पंधरकर, रशिद शेख, अजित मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

सहाव्या दिवशी पुणेकरांना झाले सूर्यदर्शन

पुणे : पीएमपीत जाणवतेय कर्मचार्‍यांची कमतरता

नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

Back to top button