राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा मीच; पक्षाध्यक्ष पवार यांचा दावा | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा मीच; पक्षाध्यक्ष पवार यांचा दावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही जण आज निघून जात असले आणि पक्षावर त्यांनी दावा सांगितला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा मीच आहे, असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तसेच पक्षावर कुणीही दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची बाजू मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांनी पुण्यात रविवारी पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले. सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्याआधीच काहीजणांनी वेगळी भूमिका घेतली.

सोडून गेलेले माझ्या संपर्कात

आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत. शपथ घेतलेल्या नेत्यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली. काही सदस्यांच्या भूमिकेचे चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल. मात्र, त्यापैकी काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला. काही लोकांनी मला सांगितले की, आम्हाला निमंत्रित करण्यात आले, आम्ही सह्या केल्या आहेत. पण, आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा दावा पवार यांनी केला. पक्षातील सदस्य सोडून जाण्याचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही.

यापूर्वीही 58 पैकी माझ्यासह 6 जण सोडले, तर सगळे पक्ष सोडून गेले होते. त्या वेळी मी केवळ पाच सदस्यांचा नेता होतो. तेव्हा पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. निवडणुका झाल्यानंतर संख्या 69 वर पोहोचली. त्यामुळे माझा महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. आजच्या स्थितीत सगळे सांगताहेत की, आमची तुम्हाला साथ आहे. ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा फोन आला. अनेक नेते आणि अनेक पक्षांनी मिळून पर्यायी नेतृत्व उभे करावे, सगळ्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडला, त्याची मला चिंता नाही, असे त्यांनी सांगितले.

यशवंतरावांच्या समाधीचे आज दर्शन घेणार

उद्या सकाळी मी बाहेर पडून कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थित राहणार आहे. लोकांशी संपर्क वाढविता येईल, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार काय म्हणाले…

  • भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले.
  • जे गेले याची चिंता नाही, मला चिंता आहे त्यांच्या भवितव्याची.
  • ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.
  • देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली.
  • पक्षाच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेमध्ये जाऊ.
  • सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार.
  • महाविकास आघाडी एकत्र काम करणार.
  • जी नावे आली आहेत, त्यांनी आजच फोन करून भूमिका मान्य नसल्याचे सांगितले.

हेही वाचा

अजित पवारांच्या धक्क्याने महाविकास आघाडीला सुरुंग

सातारा : दूध भेसळप्रकरणी 9 जणांना अटक; केमिकलसह वाहने जप्त

संघर्षाला घाबरतंय कोण ? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत

Back to top button