सातारा : दूध भेसळप्रकरणी 9 जणांना अटक; केमिकलसह वाहने जप्त | पुढारी

सातारा : दूध भेसळप्रकरणी 9 जणांना अटक; केमिकलसह वाहने जप्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या गावामध्ये काहीजण दूधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांमध्ये सातारा जिल्ह्यासह उत्तरप्रदेशातील काही जणांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी केमिकलसह वाहने जप्त केली आहेत.

बजरंग पांडूरंग जाधव (रा.खराडे ता.कराड), गणेश सुनिल पनासे (रा. हेळगांव ता.कराड), सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी ता.कराड), शरद वामन घार्गे, सचिन शंकर यादव, गणेश सुभाष मसुगडे (सर्व रा. नवीन कवठे ता.कराड जि.सातारा) अर्जुन कुमार श्रीकांत गौतम, विवेककुमार श्रीरामचंद्र गौतम, अजयकुमार गौतम (सर्व रा. उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अन्न सुरक्षा विभागाने धाडी टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला. घटनास्थळी छापे टाकून 9 हजार लिटर भेसळयुक्त दूध, केमिकल, पावडर, तेल व 5 दूध वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. नागरीकांना भेसळयुक्त दुधाची विक्री करुन त्यांच्या जिवाशी खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि.1 जुलै रोजी सायंकाळी नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ येथे धाडसत्र राबवण्यात आले. दूध भेसळीमध्ये वापरली जाणारे व्हाईट लिक्वीड, सोडीयम बायकार्बोनेट, पिरॅमिट पावडर, रिफाइंड सोयाबीन तेल असे साहित्य होते. यावेळी पोलिसांनी 5 दूध वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, विशाल पवार, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, प्रविण कांबळे, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button