अजित पवारांच्या धक्क्याने महाविकास आघाडीला सुरुंग | पुढारी

अजित पवारांच्या धक्क्याने महाविकास आघाडीला सुरुंग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची मोट बांधून भाजप आणि शिंदे गटाला नामोहरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाविकास आघाडीलाच राष्ट्रवादीतील बंडाने सुरुंग लागला आहे. बहुसंख्य आमदार आणि पक्ष अजित पवारांसोबत गेल्याने महाविकास आघाडीची ताकद घटली आहे.

2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करत मुख्यमंत्री पद मिळवले. मात्र, अडीच वर्षांनंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना वळवून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नशिबाने मिळालेली सत्ताही सोडावी लागली. तसेच या वर्षभरात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट करून आधी केंद्रात मोदींना आणि नंतर शिंदे-फडणवीस यांना राज्यात धक्का देण्याचे मनसुबे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आखले होते.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे विरोधी पक्षांच्या पाटणा येथे झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. राज्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चा करून फॉर्म्युलाही ठरविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. त्याचवेळी अजित पवार धक्का देणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून इन्कार केला जात होता, पण अजित पवारांनी धक्का दिलाच. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेतेही गेल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे.

Back to top button