पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर 4 ते 15 जुलै 2023 या कालावधीत रात्री 00.30 (सोमवारी रात्री 12.30 पासून) ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार आहे.
चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतिपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त मल्टी क्सेल वाहनांची वाहतूक 3 तासांसाठी बंद केली जाणार आहे. ही वाहने मुंबई एक्सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जातील व साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवली जातील.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी या मार्गावरील वाहतूक रात्रीच्यावेळी बंद केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करावे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.वाहतूक बंद कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील (मेन कॅरेजवे) वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरुडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सेवा रस्ता व रॅम्प – 6 चा वापर करता येईल. तसेच सातारा व कोथरुड (पुणे शहर) मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर करावा. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही.
– संजय कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय).
हेही वाचा: