पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग वाढीव बिलाचे ‘नो टेन्शन!’

Electric bike
Electric bike

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहरासह राज्याच्या काही अन्य शहरात आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांची बॅटरी चार्ज करण्यासाठी स्वतंत्र वीजजोडणी घेतल्यास घरगुती दरापेक्षाही स्वस्त वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. दरमहा शंभर युनिटपेक्षा अधिक वीजवापर असलेल्या ग्राहकांना या स्वतंत्र मीटरमुळे प्रतियुनिट साडेतीन रुपये स्वस्त वीज मिळणार आहे; तसेच एकूण वीजवापर विभागाला जाऊन जादा दरांच्या स्लॅबमधूनही सुटका होणार आहे.

वीजग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी आता स्वतंत्र वीजजोडणीचा पर्याय महावितरणने दिला आहे. आतापर्यंत वीजग्राहकांना घरगुती, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वीजजोडणीतूनच चार्जिंग करता येत होते. दररोज वाहन चार्ज करण्याने मासिक वीजवापर वाढून 'स्लॅब' बदलत होते. वाढीव स्लॅबला वाढीव वीजदर असल्याने ग्राहकांच्या खिशाला 'शॉक' बसत होता. त्याची दखल घेऊन महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजजोडणी घेण्याचा पर्याय दिला आहे. त्याचा फायदा ई-वाहन असलेल्या ग्राहकांना होणार आहे. पुण्यासह राज्यात दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. या वाहनांच्या चार्जिंगसाठी महावितरणने प्रतियुनिट वीजदरही निश्चित केले होत, मात्र ग्राहकांना स्वतंत्र वीजजोडणी दिली जात नव्हती.

कोणाचा होणार फायदा?

परिपत्रकानुसार, वैयक्तिक वीजग्राहकांसोबत 'ईव्ही' चार्जिंग सुविधेचा सामाईक वापर करणारे गृहनिर्माण सोसायटीचे सभासद, खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनाही 'ईव्ही'साठी स्वतंत्र वीजजोडणी घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

वीजवापर वाढल्यास होणार फायदा
'महावितरण'च्या सुधारित घरगुती वीजदरानुसार, दरमहा 0 ते 100 युनिटसाठी 4.41 रुपये, 101 ते 300 युनिटसाठी 9.64 रुपये, 301 ते 500 युनिटसाठी 13.61 रुपये वीजआकार लागू आहे. कंपनीने 'ईव्ही' चार्जिंगसाठी प्रतियुनिट सहा रुपये आठ पैसे वीज आकार निश्चित केला आहे. याव्यतिरिक्त वहन आकार, स्थिर आकार आदी आकार लागू केले आहेत. ग्राहकांना चार्जिंगसाठी स्वतंत्र जोडणी उपयुक्त ठरणार आहे.

शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांच्या चार्जिंगसाठी महावितरणकडून विविध सुविधा देण्यात येत आहेत. त्यानुसार, वैयक्तिक वीजग्राहक, सोसायटीचे सभासद, कंपन्यांचे कर्मचारी आदींना 'ईव्ही' चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजजोडणी घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
                                        – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news