पुणे: दोन हजारांच्या नोटा खपवा ! पेट्रोल पंप, दुकानांमध्ये वाढला कॅश व्यवहार

पुणे: दोन हजारांच्या नोटा खपवा ! पेट्रोल पंप, दुकानांमध्ये वाढला कॅश व्यवहार

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी (पुणे) : वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे सध्या अनेक नागरिक पेमेंट अ‍ॅपद्वारे दैनंदिन व्यवहारास प्राधान्य देतात; मात्र असे असताना रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांच्या नोटा चलनातून सप्टेंबरनंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सध्या दोन हजारांच्या नोटांद्वारे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा सप्टेंबरअखेरपर्यंत चलनातून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे; तसेच या नोटा कोणत्याही बँकांतून नागरिकांना बदलून घेता येतील. तसेच या नोटांद्वारे व्यवहारही करता येईल. त्यामुळे सध्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यातही व्यवहारामध्ये दोन हजारांच्या नोटांचा भरणा वाढला आहे. नागरिक किराणा दुकान, पेट्रोल पंप तसेच सोने-चांदी खरेदी, विविध कर भरणे आदी ठिकाणी दोन हजारांच्या नोटांद्वारे व्यवहार करत आहेत. सध्या बाजारात पूर्वीपेक्षा सुमारे 60 ते 70 टक्के दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढले आहे.

अशा प्रकारे करा नोट बदली

एका दिवशी एक व्यक्ती दोन हजारांच्या दहा नोटा कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकतो. 10 पेक्षा जास्त नोटा असल्यास त्या नोटा अकाउंटवर जमा कराव्या लागतात.

पूर्वी नोटांचे प्रमाण हे अगदी कमी होते. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नागरिक दोन हजारांच्या नोटांद्वारे व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत.
– अली दारूवाला, अध्यक्ष पेट्रोल पंप संघटना

दोन हजारांच्या नोटा बदली करण्यासाठी बँकेमध्ये वेगळे काउंटर खोलले आहे. सुरुवातीला दोन हजारांच्या नोटा बदली करायचे प्रमाण अधिक होते; मात्र सध्या नोटा बदलीचे प्रमाण थोडे कमी झाले आहे.

– राहुल कातोरे बँक अधिकारी

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news