पुणे: लोणावळ्यात 24 तासांत 85 मिमी पावसाची नोंद | पुढारी

पुणे: लोणावळ्यात 24 तासांत 85 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळ्यात रविवारी 24 तासांत 85 मिमी (3.35 इंच) पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारीदेखील 54 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. त्यामुळे यावर्षी 24 जूनअखेरपर्यंत लोणावळ्यात एकूण 253 मिलिमीटर (9.96 इंच) पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे.

3 ठिकाणी झाडे पडली

सलग पडणार्‍या पावसामुळे लोणावळ्यात 3 ठिकाणी झाडे पडल्याचा प्रकार घडला होता. रविवारी रात्री गवळीवाडा येथील हायलॅन्ड रोडवर पडलेले झाड लोणावळा नगर परिषद पथकाने रात्रीच बाजूला करत रस्ता मोकळा केला, तर पहाटेच्या सुमारास बाजार भागातील मगनलाल चिक्कीसमोर पडलेले झाड व वलवण गावात महादेव मंदिराजवळ पडलेले झाड रविवारी सकाळी बाजूला करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून हवादेखील असल्याने नागरिकांनी शक्यतो झाडांच्या खाली थांबू नये, झाड पडल्याच्या घटना घडल्यास लोणावळा नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भराव खचल्याने सुरक्षा भिंत कोसळली

शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरात एका ठिकाणी भराव खचल्याने सुरक्षा भिंत तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. लोणावळा शहरातील रायवूड उद्यानाच्या भिंतीचा भराव खचल्याने सदरची भिंत रस्त्यावर कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळच्या सत्रात शाळंकरी मुलांना, पालकांना व स्कूल व्हॅनचालकांना याचा त्रास सहन करावा लागला. लोणावळा नगर परिषदेने रायवूड विभागात गटार बनविण्याचे काम करताना वनविभागाच्या रायवूड उद्यानाच्या भिंतीला लागून खोदकाम करत गटार बनविले होते. हे काम करताना सदर भिंतीचा भराव व माती खोदल्याने भिंतीला आधार शिल्लक राहिला नव्हता. मागील दोन दिवसांत लोणावळ्यात झालेल्या पावसाने सदर भिंतीच्या खालील माती सरकल्याने भिंत गटार व रस्त्यावर कोसळली आहे. सर्व राडारोडा व दगड रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. लोणावळा नगर परिषदेने याकडे लक्ष देत तात्काळ राडारोडा बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सदर भिंत कोसळली तिच्या दोन्ही बाजूला काही अंतरावरील भिंतीचादेखील भराव सरकण्याची शक्यता असल्याने तीदेखील धोकादायक झाली असून, केव्हाही पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

पुणे: अकरावीची गुणवत्ता यादी 3 जुलैला होणार जाहीर; या आहेत महत्वाच्या तारखा

पुणे : पूरस्थिती रोखण्यासाठी पथके; प्रभारी मनपा आयुक्त करणार नाल्यांची पाहणी

पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष

 

Back to top button