पुणे : पूरस्थिती रोखण्यासाठी पथके; प्रभारी मनपा आयुक्त करणार नाल्यांची पाहणी | पुढारी

पुणे : पूरस्थिती रोखण्यासाठी पथके; प्रभारी मनपा आयुक्त करणार नाल्यांची पाहणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 10 ते 12 मिमी पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाण्याची तळी साचत असल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथके नेमून ती 24 तास सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिल्या. महापालिकेची पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली आहेत. शहरात पूर्वमोसमी पाऊन न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचणार्‍या ठिकाणांचा अंदाज लावणे शक्य होत नाही. मागील वर्षी पाणी साचणार्‍या ठिकाणी उपाय योजना केल्या आहेत.

मात्र, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, नगर रस्ता, तसेच काही भागांत पाणी साचत असले, तरी अद्याप त्या ठिकाणी पावसाळी वाहिन्या, तसेच ड्रेनेजचे जाळे नाही. अशा ठिकाणांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, त्यात बिगारी, अभियंते यांच्यासह, पाणी तसेच गाळ काढण्याचे पंप, जेसीबी, तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, या पथकांना 24 तास सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई

पहिल्याच पावसात शहरात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर बिनवडे यांनी सोमवारी (दि.26) अधिकार्‍यांची बैठक घेतली. पावसामुळे झाडपडीच्या घटना घडतात. अशा वेळी उद्यान विभागाची मदत आवश्यक असते. मात्र, शनिवारी- रविवारी उद्यान विभागाचे कर्मचारी मोबाईल बंद ठेवतात, अशी तक्रार या बैठकीत अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी केली. त्यावर बिनवडे यांनी सुट्टीचा दिवस असला, तरी कोणत्याही विभागाच्या विभागप्रमुख तसेच कर्मचार्‍यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

प्रकल्पांचा अहवाल तातडीने द्या

महापालिकेच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे? याची माहिती विभागप्रमुखांना नाही. ही बाब उजेडात आल्याने महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी प्रकल्पांचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त एक आठवडा सुटीवर असल्याने आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे सोपविला आहे. बिनवडे यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा व प्रकल्पांचा आढावा घेतला. अनेक विभागप्रमुखांना आपल्याच सुरू असलेल्या प्रकल्पांची स्थिती काय आहे? याची माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे बिनवडे यांनी आपापल्या विभागांकडून केल्या जाणार्‍या विविध प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले.

हेही वाचा

इंदापूर : पालखी महामार्गाच्या कामामुळे वारकर्‍यांचा प्रवास झाला सुखकर

पुणे : मोबाईलवरून भरा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज

कोल्‍हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : निष्पाप अर्जुन, बिचार्‍या तेजस्विनीचा काय दोष?

Back to top button