पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष

वरकुटे बुद्रुक(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याची देखभाल करण्याबाबत पाटस टोल प्रशासनाने उदासीनता दाखविली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठले. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला. त्याचा स्थानिक प्रवाशांना त्रास होत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती केली जाते. यातच सेवा रस्त्यावरील कामे होणे अपेक्षित असते.

परंतु, टोल प्रशासकाकडून फक्त महामार्गावरील अत्यावश्यक कामे केली जातात. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सेवा रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून येते. सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाचे पाणी त्यात साठत आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. स्थानिक प्रवाशांना टोल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्रास सोसावा लागत आहे.

लोणी देवकर व बिजवडी कारखान्याच्या चौकातील रस्त्याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली. यामुळे पावसाळ्यात अपघात होऊ शकतो. टोल प्रशासनाला याबाबतची विचारणा केली असता, सेवा रस्त्याची पाहणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम केले जाईल, असे सांगण्यात आले.
सेवा रस्त्याची देखभाल ही टोल प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्ता दुरुस्तीचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीचे निवास शेळके यांनी केला.

हेही वाचा

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; कारण आले समोर

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन

ट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचित; अहमदनगर जिल्ह्यातील सात जणांचा समावेश

Back to top button