येरवडा : ‘मुळा-मुठा’त राडारोडा टाकून बनविले बेट ! शांतीनगर परिसरात पुराचा धोका

येरवडा : ‘मुळा-मुठा’त राडारोडा टाकून बनविले बेट ! शांतीनगर परिसरात पुराचा धोका

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुळा-मुठा नदीपात्रात शांतीनगरकडून अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीकडे जाणार्‍या टँक रोडवरील नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बेट तयार करण्यात आले आहे. यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रशासन व नदीपात्रात अतिक्रमण करणार्‍यांचा निषेध करण्यात आला. नदीच्या पात्रात बाहेरून राडारोडा आणून भराव टाकण्यात येत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली नदी पात्रात उभे राहून स्थानिक कार्यकर्ते व रहिवाशांनी आंदोलन केले.

नदीपात्र बुजविण्याच्या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, खडकी पोलिसांनी त्वरित कारवाई करीत एक बुलडोझर आणि एक ट्रक जमा केला व भर टाकणार्‍या लोकांना अटक केली. आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निषेधाचे आणि कारवाई करण्याच्या मागणीचे फलक हाती घेऊन 'मुळा-मुठा नदी बचाओ'च्या घोषणा दिल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

या आंदोलनात स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, प्रियांका रणपिसे, काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष सचिन भोसले, शिवानी माने, सारिका मुंडवरे, वैशाली रेड्डी, संध्या कांबळे, आदेश करकरे, अनुज कांबळे, अमर पाटोळे, नंदू राक्षे, किरण खंडाळे, दीपक शिंदे, आनंद कांबळे, रोहित राणा, करण वाल्मीकी, नीलेश माकासरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याची भीती

नदीपात्रात राडारोडा टाकून बेट तयार करण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यात नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन पुराचे पाणी शांतीनगर, कतारवाडी, कळस, फुलेनगर व इतर भागांतील रहिवाशांच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर पाणी येऊन वाहतुकीची समस्या गंभीर होण्याचीही शक्यता आहे. काही समाजकंटक राजरोसपणे राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचा प्रकार करीत असल्याचे या वेळी आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news