पंढरपूर : लाखो वैष्णवांच्या साक्षीने बंधुभेटीचा सोहळा रंगला

पंढरपूर : लाखो वैष्णवांच्या साक्षीने बंधुभेटीचा सोहळा रंगला

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : 

ही माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।
पंढरीचा वारकरी
वारी चुको न दे हरी ॥

पंढरपूर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व संत सोपानकाका यांच्या बंधुभेटीचा सोहळा टाळ-मृदंगांच्या व मुखी विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वैष्णवांच्या साक्षीने टप्पा (ता. पंढरपूर) येथे सोमवारी पार पडला. या बंधुभेटीप्रसंगी टाळ- मृदंगाचा ताल… 'विठ्ठल विठ्ठल' नामाचा गजर…. पाणावलेले वैष्णवांचे डोळे अशा उत्कंठावर्धक वातावरणात आकाशात दाटलेल्या ढगाळ वातावरणामुळे वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले होते.

बंधुभेट सोहळा व पंढरीची वारी म्हणजे वैष्णवांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होय. सोमवारी सकाळपासूनच प्रमुख पालखीसह संत गुलाब बाबा महाराज, संत गोविंद महाराज उपळेकर, संत निळोबा, राम महाराज, संत गवारशेठ लिंगामत वाणी, चांगा वटेश्वर आदी विविध पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. ज्ञानोबा- तुकोबांचा जयघोष, खांद्यावर भगवी पताका व टाळ मृदंगाच्या गजरात तरुणाईबरोबर अबालवृद्ध वारकरी लाडक्या विठ्ठलाला अभंगातून दिलेली हाक, ललित वाजणारे टाळ आणि विठू नामाचा गजर करीत पालखी सोहळ्यातील एक एक दिंडी पुढे सरकत होती. त्याचवेळी बंधुभेटीचा सोहळा पाहण्यासाठी पालखीतील वैष्णव व परिसरातील ग्रामस्थांनी सोहळ्याच्या ठिकाणी गर्दी केली होती.

मुखी विठ्ठल बोला असे म्हणत सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून लगबगीने चालत होते. कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवाची मांदियाळी पंढरपूर तालुक्यात दाखल झाली. टाळ मृदंगांचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम यांच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला होता. भक्तीरसात तल्लीन होऊन देहभान विसरून महिला पुरुष वारकर्‍यांचा संतमेळा, फुगड्यांचा फेरा सुरू असताना अचानक माऊली आणि सोपानकाका पालखी सोहळा सर्वांच्या नजरेमध्ये बसला आणि सर्व वैष्णवांच्या नजरा क्षणार्धात बंधुभेटीकडे लागल्या. दोन्ही पालखी सोहळा समिप येऊ लागला. तस तसा संपूर्ण परिसर वैष्णवांच्या टाळ्यात व विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात चैतन्यमय झाला. अखेर सायंकाळी 5 वाजता माऊली व सोपान काका बंधूभेटीचा सोहळा वैष्णवांच्या भक्तीरसात न्हावून निघाला.

दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत : बंधुभेटीनंतर प्रथम सोपानकाका व नंतर ज्ञानेश्वर पालखी सोहळा भंडीशेगाव येथे मुक्कामी मार्गस्थ झाला. या बंधुभेटीनंतर या दोन्ही पालखी सोहळ्याचे ग्रामपंचायत पिराची कुरोली व पंढरपूर तालुका प्रशासनाकडून तोफांची सलामी देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकारी, अधिकारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news