सोलापूर : ठाकूरबुवा रिंगण सोहळा लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला

सोलापूर : ठाकूरबुवा रिंगण सोहळा लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला

वेळापूर;धनंजय पवार :  वेळापूर मुक्काम आटोपून सकाळी सहाला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. पालखी मार्गावरील उघडेवाडी हद्दीत ठाकूरबुवा यांच्या समाधीजवळ सकाळी आठला माऊलींचे तिसरे गोल रिंगण पार पडले. यानंतर साडेआठला रिंगण जागेवर पालखी ठेवण्यात आली. यावेळी पालखीला विणेकरी, पताकाधारी, तुलशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला यांनी गोल कडे केले होते. हे गोल रिंगण उपस्थित लक्ष लक्ष नयनांनी अनुभवले. भाविकांच्या डोळ्यांची पारणे फिटली.

रिंगण सोहळ्याअगोदर पालखी सोहळा उघडेवाडी हद्दीत पोहोचल्यावर सरपंच जिजाबाई गवळी, उपसरपंच सीमाली साठे, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग ठवरे, अजित देशमुख, डॉ. धनंजय साठे, रवी घोरपडे, नितीन चौगुले, प्रदीप सरवदे, स्वप्निल सरवदे, सयाजीराव उघडे,
भारत कोळपे, भाऊसाहेब जानकर, बिरा देवकते, देवा जाधव यांनी स्वागत केले. यानंतर रिंगण सोहळा, पालखी सोहळा प्रमुख व चोपदार यांनी रिंगण लावले. यावेळी सर्वात आधी माऊलींचा अश्व व स्वाराचा अश्व धावले. यात सर्वात आधी जरी पटक्याचा ध्वज घेऊन मानकरी यांनी रिंगणाला एक गोल फेरी पूर्ण केली. माऊलींचा अश्व व स्वाराचा अश्व दाखल झाल्यानंतर हे रिंगण चोपदार यांनी लावले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी ठाकूरबुवा समाधी परिसर वैष्णवांनी फुलला होता. या सोहळ्याला 8 वा. 45 मि. सुरुवात होऊन अश्वाच्या तीन फेर्‍या 8 वाजून 54 मिनिटांल्या संपल्या. नऊ मिनिटे हा रिंगण सोहळा चालला. या सोहळ्यानंतर लगेच माऊलींचा अश्व दाखल झाल्यानंतर सकाळपासून दर्शनासाठी आसुरलेल्या भक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात माऊली माऊली… गजर केला.

या वेळी सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूज पोलिस उपविभागीय अधिकारी व डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूरचे सहायक पोलिस निरिक्षक नीलेश बागाव व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब ओव्हाळ, डॉ. नंदवतर यांच्यासहकर्मचार्‍यांनी वारकर्‍यांवर मोफत औषोधोपचार केले. हा रिंगण सोहळा हा येथील शेतकरी व्यवहारे व भगत यांच्या शेतात झाला. या वेळी सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. हा रिंगण सोहळा हा उघडेवाडीकरांसह परिसरातील सर्वांसाठी आनंदाचा क्षण ठरला. सोहळ्यानंतर पालखी ठाकूरबुवा समाधी मंदिर येथील रथामध्ये साडेदहाला ठेवण्यात आली. यानंतर आरती होऊन पालखी सोहळा तोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी व टप्पा येथील माऊली व सोपानकाका यांच्या भेटीसाठी जयघोषात मार्गस्थ झाला.

अश्वाच्या टापांखालची माती मस्तकी

गोल रिंगण सोहळ्यात स्वाराचा अश्व पुढे, त्यापाठोपाठ माऊलींच्या अश्वाने काही क्षणांत तीन फेर्‍या पूर्ण केल्या. यानंतर उपस्थित भाविकांनी माऊली माऊली…चा एकच जयघोष केला. अश्वाच्या टापाखालची माती मस्तकी लावण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. यानंतर पारंपरिक पद्धतीने माऊलींच्या नामाचा गजर करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news