

वडगाव मावळ (पुणे) : शहरात गेल्या दहा दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक नागरिकांसह तालुक्यातून विविध शासकीय कामांसाठी येणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरण कंपनीने योग्य ती उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, कार्याध्यक्ष सुरेश जांभूळकर, अविनाश चव्हाण, संतोष खैरे, शैलेश वहिले, तुषार वहिले, गणेश ढोरे, भाऊसाहेब ढोरे, मयूर गुरव, मजहर सय्यद आदींनी महावितरणचे अधिकारी शाम दिवटे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, या ठिकाणी तालुक्यातून अनेक ठिकाणाहून नागरिकांची वर्दळ होत असते. प्रामुख्याने तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, दुय्यम निबंधक व तलाठी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सहायक निबंधक कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ अशी अनेक मुख्य शासकीय कार्यालय आहेत. तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कामांसाठी शहरात येत असतात. दर महिन्याला येणारे लाईट बिलदेखील नागरिकांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना दंडाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून वडगाव शहरात दिवसा व रात्री लाईट जाण्याचे प्रमाण वारंवार होत असून, याचा व्यवसायावरदेखील परिणाम होत आहे. व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थी, महिला व नागरिक हे वारंवार लाईट जात असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने रात्रीच्या वेळी चोर्यादेखील घडू शकतात. संपूर्ण वडगाव शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी रात्रीच्यावेळीदेखील एक वायरमन कर्मचारी द्यावा.
हेही वाचा: