महिन्यात चारवेळा रोहित्र जळाले; कळसला पिकांचे नुकसान | पुढारी

महिन्यात चारवेळा रोहित्र जळाले; कळसला पिकांचे नुकसान

कळस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कळस (ता.इंदापूर) येथील पाझर तलावालगतचे रोहित्र महिन्यात चारवेळा जळाल्याने येथील सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. महावितरण कंपनीविरोधात संताप वाढला असून, वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे. अगोदरच पावसाने ओढ दिल्याने शेतक-यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अवघड झाले आहे. अशातच हे रोहित्र महिन्यात चारवेळा जळाल्याने शेती करावी की सोडून द्यावी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतक-यांबरोबरच येथील नागरिकांनाही विजेअभावी पिण्याचे पाणी विहिरीतून खोलवरून शेंदून काढावे लागत आहे. शेतक-यांनी जीवापाड जोपासलेली उसासह इतर पिके पाण्याविना शेतक-यांच्या डोळ्यांसमोर जळत आहेत. महावितरणने रोहित्र तातडीने बदलून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी सदाशिव पाटील यांनी केली. तसेच जळालेले रोहित्र बदलताना ते सदोष आहे का ? याची पाहणी करणे गरजेचे आहे, असे शेतकरी जावेद मुलाणी यांनी सांगितले.

संबंधित रोहित्रावर अतिरिक्त ताण येत असल्याने वारंवार बिघाड होत आहे. तलावात पाणी आल्यानंतर अनेकजण वीज चोरून वापरतात. तसेच मंजूर भारापेक्षा जास्त भाराचे वीज पंप वापरले जातात. परिणामी, अतिरिक्त ताण आल्याने रोहित्र जळते. सध्या पालखी आपल्या परिसरात असल्याने दोन दिवसांनंतर ती पुढे गेल्यावर दक्षता घेऊ.

– ए.बी. यादव,
शाखा अभियंता, महावितरण.

हेही वाचा

भामा आसखेड : तळवडे पाझर तलाव कोरडाठाक

शिरूर : ढापे चोरणारी टोळी 14 तासांत गजाआड

नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण

Back to top button