भामा आसखेड : तळवडे पाझर तलाव कोरडाठाक | पुढारी

भामा आसखेड : तळवडे पाझर तलाव कोरडाठाक

भामा आसखेड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळवडे (ता. खेड) येथील पाझर तलावातील पाण्याचा वापर काही लोकांनी शेतीसाठी केल्याने तलाव कोरडाठाक पडला आहे. तलावातील पाणी उपसल्याने गावच्या विहिरींचा उद्भव कमी झाला असून, गाव परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असून, गावासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
तळवडे गाव तालुक्याच्या पश्चिम भागात असून, गावाला दोन पाझर तलाव आहेत.

गावापासून काही अंतरावर म्हणजेच पाझर तलावाजवळ गाव पाणीपुरवठ्याच्या विहिरी आहेत. तलावातील पाणी कमी झाले की विहिरीची पाणी पातळी कमी होते आणि नागरिकांना पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होते. तलावात जोपर्यंत पाणी असते तोपर्यंत विहिरीत पाणी साचून राहिल्याने पिण्याचे पाण्याची टंचाई भासत नाही. परंतु काही शेतकर्‍यांनी तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा आपल्या शेतात केल्याने तलावात ठिपूसभर पाणी ठेवले नसल्याने अक्षरशः तलाव कोरडाठाक पडला आहे. विहिरीची पाणीपातळी अतिशय कमी झाल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

गावच्या काही लोकांनी पाझर तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी केल्याने तलाव आटला आहे. तलावातील पाणी शेतीसाठी वापरणार्‍यांवर कारवाई अपेक्षित आहे. या भागातील तलाठी व सर्कल यांचेदेखील या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी जागरूक राहून पाणीउपसा करणार्‍यांवर कारवाई केली असती, तर आज पाणीटंचाईची वेळ आली नसती. सध्या गावात शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पुलाच्या कामासाठी पिण्याचे पाणी वापरले?

गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीजवळच्या रस्त्यावर साकव पुलाचे काम सुरू असून, तो गावासाठी महत्त्वाचा आहे. पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण झाला नाही तर गावचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. मात्र, ठेकेदाराने पिण्याचे पाणी कामासाठी वापरल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या कामाला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.

तेव्हा ठेकेदार ज्या विहिरीतून पाणी घेतो आहे ती विहीर पिण्याच्या पाण्याची नाही व त्यामध्ये टँकरने पाणी सोडले जात नाही, असे स्पष्ट झाले. मात्र, याच विहिरीच्या शेजारी असलेल्या दुसर्‍या विहिरीत टँकरने पाणी सोडले जाते आणि त्या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही अंशी पाणी पाझरून दुसर्‍या विहिरीत जात आहे.

हेही वाचा

नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे

शिरूर : ढापे चोरणारी टोळी 14 तासांत गजाआड

वालचंदनगर : डाळिंब बागांना क्रॉप कव्हरने नवसंजीवनी

Back to top button