पुणे : अपघात विमा बंद; मग वैद्यकीय योजनांसाठी विमा कंपनी का? कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सवाल | पुढारी

पुणे : अपघात विमा बंद; मग वैद्यकीय योजनांसाठी विमा कंपनी का? कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रीमियम जास्त आणि लाभ कमी, या कारणामुळे ‘पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’ बंद करण्यात आली. मात्र, अंशदायी वैद्यकीय योजना आणि शहरी गरीब योजना विमा कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे दुटप्पी भूमिका घेणार्‍या महापालिका प्रशासनाविरोधात कर्मचारी व नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शहरी गरीब योजना विमा कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंने (आठवले गट) दिला आहे.

नियमित मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारकांच्या कुटुंबांसाठी महापालिकेकडून ‘पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’ राबविली जात होती. मागील चार वर्षांत 20 कोटी प्रीमियम भरला आहे. मात्र, या कालावधीत 160 लाभार्थ्यांना साधारण 5 कोटींचा लाभ मिळाला आहे. विमा कंपनीला दिल्या जाणार्‍या विम्याच्या रकमेच्या हप्त्याच्या तुलनेत लाभार्थीच मिळत नसल्याने या योजनेसाठीची अंदाजपत्रकात तरतूदच करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आरोग्य विभागाकडून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना दुसरीकडे मात्र महापालिकेचे अधिकारी आजी-माजी सभासद आणि कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येणारी अंशदायी वैद्यकीय योजना (सीएचएस) विमा कंपनीकडे देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

महापालिकेकडे स्वतःचा अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणारा एकही दवाखाना नाही. अपघात विमा योजना बंद करून शहरी गरीब योजना विमा कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही योजना पालिकेनेच चालू ठेवावी, ती विमा कंपनीकडे देऊ नये; अन्यथा रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे,
माजी उपमहापौर (रिपाइं)

हेही वाचा

पुणे शहरात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स ! दै. पुढारी’ने गोदामांबाबत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

पुणे : तीन कनिष्ठ अभियंते पालिका सेवेतून बडतर्फ

Back to top button