पुणे : ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स ! दै. पुढारी’ने गोदामांबाबत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर | पुढारी

पुणे : ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स ! दै. पुढारी’ने गोदामांबाबत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

महेंद्र कांबळे
पुणे :  व्यापारी गोदामात गॅससिलिंडर किंवा कोणताही ज्वलनशील पदार्थ ठेवण्याची परवानगी नसतानाही शहरातील अनेक गोदामांत ते ठेवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव दै. ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे. बिबवेवाडी येथे तब्बल 22 गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी सिलिंडर घाईघाईने बाहेर काढण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदामांत सिलिंडरचा अनधिकृतरीत्या वापर होत असल्याचेही स्पष्ट झाले. ‘ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स’ अशीच काहीशी परिस्थिती गंगाधाम-कोंढवा रोडवर असलेल्या गोदामांची आहे.
गंगाधाम-कोंढवा रोडवर काकडेवस्तीजवळ गंगाधाम-कोंढवा रोड परिसरात 500 हून अधिक छोटी-मोठी गोदामे, दुकाने आहेत. त्यातील अनेक अनधिकृतरीत्या बांधलेली आहेत. यांचे फायर ऑडिट केले आहे काय? असा प्रश्न विचारल्यावर येथील व्यावसायिकांकडून गोदामे तात्पुरती असल्याचे अग्निशमन दलाला सांगण्यात येते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून गोदामाच्या मालकांना व चालकांना आग नियंत्रणांत आणण्यासाठी अग्निरोधक वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दै. ’पुढारी’च्या पाहणीदरम्यान येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तसेच येथील व्यापार्‍यांना येथे कर्मचारी वास्तव्यास असतात का? असा प्रश्न केल्यानंतर त्यांच्याकडून ‘नाही’ असे उत्तर देण्यात आले. जीवितहानी भरून काढता येत नाही. या धोरणान्वये आम्ही वागत असल्याचे व्यापार्‍याने सांगितले. गोदामात कामगार राहत असल्याची शक्यताही नाकारली. कामगारांनीही दुजोरा देताना रात्रीच्या वेळी येथे कोणी राहत नसल्याचे सांगितले, तर काही व्यापारी एकमेकांवर आरोप करीत आग यांच्यामुळेच लागल्याचे व्हिडीओ दाखवून सांगत होते.

‘जळीतकांडा’नंतर पालिकेला जाग

टिंबर मार्केटनंतर बिबवेवाडी येथे झालेल्या जळीतकांडानंतर अखेर महापालिकेला जाग आली आहे. गंगाधाम ते कात्रज-कोंढवा दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या आणि शहरातील इतर बेकायदा गोदामांसह मंगल कार्यालयांचा सर्व्हे करून एक मोठी कारवाई हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गंगाधाम ते कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दरम्यान बिबवेवाडी आणि कोंढव्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर गोदामे झाली आहेत. विकास आराखड्यात हा परिसर हिलटॉप, हिलस्लोपमध्ये असतानाही ही गोदामे झाल्याने त्यांना तीनपट टॅक्स आकारण्यात आला आहे. तसेच, बांधकाम विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावून काही गोदामे जमीनदोस्त केली. परंतु यानंतरही अनेकांनी नोटिसाविरोधात न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे.  आगीच्या पहिल्या घटनेनंतर  कोणतेही ठोस पाऊल  उचलले नव्हते.

बिबवेवाडी येथील कारवाई

2021 पासून कारवाई एकूण 1 लाख 76890 चौरस फूट बांधकामे पाडली.
50 शेडवर कारवाई
27 दावे दाखल आहेत.
बीडीपीमध्ये 127 मिळकती असून, ज्यात व्यावसायिक शेड व निवासी मिळकतींचा समावेश आहे. या सर्वांना नोटीस दिल्या आहेत.
आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लागलेली आग उशिरा कळली. त्यामध्ये रविवारची सुटी असल्याने देखील आगीबाबत उशिरा कळल्याचे दिसते. ही सर्व गोदामे टेकडीवर असल्याने व हवेचाही वेग मोठा असल्याने आग काही कालावधीच पसरली. गोदामांमध्ये असलेल्या पार्टिशनला ताकदच नसल्याने आग एका गोदामातून दुसर्‍या गोदामात लवकर पोहचली. मात्र, गोदामात एकही सिलिंडर आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी आग लागल्यापासून सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जवान घटनास्थळी असल्याचे या वेळी दिसून आले.
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन दल
महापालिकेने बेकायदा गोदामांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. परंतु या विरोधात गोदामांचे मालक न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. ही सर्व स्थगितीची प्रकरणे एकत्र करून न्यायालयात पुन्हा एकदा वस्तुस्थिती मांडून स्थगिती उठविण्यासाठी पावले उचलत आहोत. स्थगिती उठताच व्यापक कारवाई करण्यात येईल.
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका
हेही वाचा

Back to top button