पुणे : तीन कनिष्ठ अभियंते पालिका सेवेतून बडतर्फ | पुढारी

पुणे : तीन कनिष्ठ अभियंते पालिका सेवेतून बडतर्फ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविलेल्या तीन कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंबंधीचे आदेश दिले. महापालिका प्रशासनाने गत वर्षी 448 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या 142 जागांची भरती करण्यात आली. तीन वर्षांचा अनुभवाचा पुरावा म्हणून फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यांसह 11 प्रकारची कागदपत्रे आवश्यक होती.

कनिष्ठ अभियंता पदाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या काही उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रात पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्र बनावट दिली असल्याचा आरोप झाला होता. त्यात भरती झालेल्या काही अभियंत्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या आधारावर नोकरी मिळवताना अभियांत्रिकीची पदवी लपविली तसेच अभियांत्रिकी पदवी एका शहरात, तर पूर्ण वेळ नोकरीचे ठिकाण मात्र दुसर्‍याच शहरात असेही प्रकार आढळून आले होते.

यासंबंधीच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी सेवकवर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य लेखा परीक्षक अमरिश गालिंदे या तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमली होती. त्यात कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालानुसार तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे आढळले.

हेही वाचा

सांगली : आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडीत पुन्हा धर्मांतराचा प्रयत्न

Moonson : जूनच्या सरासरीत महाराष्ट्रात यंदा नीचांकी पाऊस; पेरण्या खोळंबल्या

Back to top button