होर्डिंगमुक्त झाल्याने पुणे- मुंबई महामार्ग घेतोय मोकळा श्वास | पुढारी

होर्डिंगमुक्त झाल्याने पुणे- मुंबई महामार्ग घेतोय मोकळा श्वास

गणेश विनोदे

वडगाव मावळ(पुणे) : किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पुणे- मुंबई महामार्गालगतचे होर्डिंग, मोठमोठे बोर्ड काढून टाकले असून, यामुळे महामार्गाने मात्र मोकळा श्वास घेतला आहे. पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आलेे होते. जवळपास सगळेच होर्डिंग, बोर्ड हे अनधिकृत होते. काही ठिकाणी खाजगी जागेत असले तरी त्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, तर काही ठिकाणी पीएमआरडीए किंवा रस्ते विकास महामंडळाच्या जागेत हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.

विनापरवाना किंवा शासकीय जागेत लावलेल्या या होर्डिंग्जच्या जागेचे भाडे जागा मालक किंवा जागेवर ताबा असणार्‍या व्यक्तीला व फ्लेक्स लावण्याचे भाडे होर्डिंग उभे करणार्‍या एजन्सीला मिळत असे. त्यामुळे या धंद्याला कुठलाही कर अथवा दंड आकारला जात नव्हता; परंतु राजरोसपणे हा होर्डिंगचा धंदा मात्र जोमात सुरू होता.

दरम्यान, किवळे येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या हद्दीतील सर्व होर्डिंग पूर्णपणे काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. खाजगी जागेत असलेले होर्डिंग काढण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, पीएमआरडीए च्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.

रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धडक कारवाई मुळे महामार्गाच्या दोन्ही बाजू मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे होर्डिंगच्या कचाट्यातून सुटलेला महामार्ग मोकळा श्वास घेताना दिसत आहे. या धडक कारवाईमुळे काढण्यात आलेले होर्डिंग्ज पुन्हा उभे राहू नयेत यासाठी कडक नियम करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

राजकीय पदाधिकारी अन फ्लेक्स व्यावसायिकांची मात्र निराशा !

महामार्गाच्या कडेला असलेल्या या होर्डिंगवर व्यावसायिकांसह राजकीय नेते, पदाधिकारी यांचे फ्लेक्स लावण्याचे प्रमाण मोठे असून लग्नसराई मध्ये शुभविवाहाचे फ्लेक्सही लावले जातात. परिणामी, फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांच्या दृष्टीने होर्डिंग हे व्यवसायाचे उत्तम साधन होते. परंतु आता होर्डिंगच राहिले नसल्याने राजकीय पदाधिकारी व फ्लेक्स व्यावसायिकांची निराशा झाली आहे.

खाजगी व्यवसाय असो अथवा सामाजिक, राजकीय कार्यक्रम असो जाहिरात होणे आवश्यक असते. परंतु, यासाठी छोटे छोटे फ्लेक्स लावून जाहिरात करता येऊ शकते, मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे जाहिरातीसाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. या अनाठायी खर्चाला आता फाटा बसणार आहे. तसेच परिसरही मोकळा दिसणार आहे.

– रूपेश म्हाळसकर, तालुकाध्यक्ष, मनसे

हेही वाचा

लोणावळा : देशाचा कारभार कुणी चालवायचा, हे प्रादेशिक पक्ष ठरवतील

श्रीरामपूर : ‘सोमा’ आणि ‘लाला’चा हॉटेलमध्ये धुडगूस

श्रीरामपूर : जिल्ह्यासाठी भाजप पदाधिकारी विखेंच्या दारी

Back to top button