लोणावळा : देशाचा कारभार कुणी चालवायचा, हे प्रादेशिक पक्ष ठरवतील | पुढारी

लोणावळा : देशाचा कारभार कुणी चालवायचा, हे प्रादेशिक पक्ष ठरवतील

लोणावळा(पुणे) : देशातील सध्याची परिस्थिती सुव्यवस्थेच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी तुम्हांलाही कार्यरत व्हावे लागेल. तुम्ही सर्व डॉक्टर सुजाण नागरिक आहात. तुम्ही यासाठी सामाजिक जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. आता देशाचा कारभार कोणी चालवावा याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, यात कोणती शंका नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणावळ्यात केले. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून लोणावळ्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात राज्यातून सहभागी 400 निमंत्रित डॉक्टरांना या दोन दिवसात वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चा सत्रातून मार्गदर्शन केले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आ. निलेश लंके, सुनील शेळके, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राजकारण करताना व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे सल्ले गरजेचे आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस विविध क्षेत्रात वेगवेगळे सेल निर्माण करीत आहे. याचे अनेक फायदे होताना दिसत आहे. तुम्ही डॉक्टर लोकांना त्यांच्या शारीरिक व मानसिक अडचणीच्या काळात मदत करता. त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो, एक वेगळं नातं तयार होतं. ऋणानुबंध जुळतो. तो तुम्ही जतन केला पाहिजे. गेले काही मणिपूरमध्ये जाळपोळ सुरू आहे. सरकार काही करत नाहीय. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. जात, धर्म यांच्या नावाखाली समाजामधील विविध गटांमध्ये तेढ व द्वेष निर्माण केला जातोय.

इंजेक्शन देताना कानात सांगा, कोणाला मतदान करायचं

तुम्ही सर्व डॉक्टर सुजाण नागरिक आहात. तुम्ही यासाठी सामाजिक जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. त्या आधी आणि नंतर काय घडलं. ते आपल्या देशातील शहाण्या जनतेने घडवले. आत्ताही आपल्याला या जनतेपर्यंत हे सगळे पोहचवले की, बदल निश्चित आहे. त्यामुळे डॉक्टरांनी इंजेक्शन देताना कानात सांगा, त्यांनी कोणत्या बाजूने मतदान करायला हवे. हे कार्य केले तर सत्तांतर नक्की असल्याचे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

पिंपरी : निगडीतील जागा शिवजयंतीसाठी ठेवा; मुखमंत्र्यांचे पीएमआरडीएला आदेश

Nashik : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्त युवतीच्या मदतीला

पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मारकाला राज्य सरकार देणार पाच कोटी

Back to top button