श्रीरामपूर : ‘सोमा’ आणि ‘लाला’चा हॉटेलमध्ये धुडगूस | पुढारी

श्रीरामपूर : ‘सोमा’ आणि ‘लाला’चा हॉटेलमध्ये धुडगूस

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकाजवळील असणार्‍या एका हॉटेलमध्ये ‘सोमा’ आणि ‘लाला’ या जोडगोळीने हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याची डावखर रोड परिसरात चर्चा आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी एकीकडे अनेकजण रस्त्यावर उतरले होते. सर्वच संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.

मात्र, त्याच दिवशी सायंकाळच्या वेळी ‘तल्लफ’ लागलेल्या ‘सोमा’ आणि ‘लाला’ यांनी रेल्वेस्थानकाजवळील हॉटेल मागच्या बाजूने उघडण्यास आपली ‘समरी पॉवर’ वापरली. याचवेळी त्यांच्यासारखे काही जणांनी (प्रतिष्ठित) हॉटेलमध्ये प्रवेश केला. ‘सोमा’ आणि ‘लाला’ हॉटेलच्या दर्शनी भागात बसले तर इतर प्रतिष्ठित मागे बसलेले होते. हॉटेल बंद असल्याने वेटरांची संख्या नगण्यच होती.

काही वेळानंतर ‘लाला’ च्या अंगात ‘खाकीची पॉवर’ संचारली. वेटरला शिवीगाळ करीत त्याने हॉटेलमधील बाटल्यांसह इतर वस्तू फेकण्यास सुरूवात केली. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वेटरची धावपळ उडाली. काही क्षण थांबल्यानंतर या ‘लाला’ ने हॉटेलभर पैशांची उधळण केली. आपल्या मित्राचा हा प्रताप पाहता ‘सोमा’ ला ‘स्टोव्ह’ चीच आठवण आली. स्टोव्हची टाकी फुटते की काय? असा क्षणभर विचार त्याच्या मनात आला.

हा सर्व प्रकार बघून हॉटेलमधील वेटरांनी हॉटेलच्या मालकांना फोन लावला. परंतु हॉटेलचे चालक मंबई येथे असल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. यानंतर हॉटेल चालकांचा दुसरा भाऊ या ठिकाणी आला. या दोघांचीही यावेळी समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यांना हॉटेलच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

या दोघांचाही प्रताप पाहून प्रतिष्ठितांनी या ठिकाणाहून काढता पाय घेणेचे पसंद केले. विशेष म्हणजे या दोघांमधील एकजण पोलिस खात्यात नोकरीला आहे. नेमणूकही नगर जिल्ह्यातलीच आहे. या प्रकारामुळे डावखर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. परंतु संबंधित बसलेल्या सर्वांनाच याची कोणतीही पर्वा नव्हती. यापुर्वीही या रस्त्यावर अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु याकडेही कोणीही फारसे लक्ष देत नाही.

रेल्वेस्थानकाबरोबर बसस्थानकाच्या हॉटेलमध्ये असे प्रकार रोजच घडत असतात. परंतु ज्याच्या हाती कायद्याचा दोरी असेल त्याला वेसण घालणार कोण? असा प्रश्न अनेक व्यावसायिकांनी उपस्थित केलेला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत लक्ष घालून हॉटेल व्यावसायिकांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पैशांचीही केली दोघांनी उधळण

मुंबई येथील डान्सबार येथे बारबारांवर पैसे उधळणार्‍या अनेकांना कोणीही विसरू शकत नाही. परंतु श्रीरामपुरातील हॉटेलमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याने आपल्या साथीदारासह हॉटेलमध्ये पैशांची उधळण केली. त्यामुळे या ठिकाणी नेमके कोणी खास व्यक्ती उपस्थित होती का? अशी शंका उपस्थित होत आहे. हॉटेलभर पैशांचा ‘धुर’ करणार्‍या या दोघांच्याही नोटा उचलण्यासाठी वेटरांना झाडुचा वापर करावा लागला. यामध्ये वेटरांनाही काही ‘लक्ष्मी’ ची प्राप्ती झाली. या घटनेही शहरामध्ये जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा

अकोले : अखेर अल्पवयीन मुलीस पळविणार्‍यास अटक

श्रीरामपूर : जिल्ह्यासाठी भाजप पदाधिकारी विखेंच्या दारी

लोणी : भंडारदरातून आवर्तन सुटले : मंत्री विखे पा.

Back to top button