पुण्यात झाड रिक्षावर कोसळून महिलेचा मृत्यू | पुढारी

पुण्यात झाड रिक्षावर कोसळून महिलेचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरातील मुक्तांगण शाळेजवळ पालखी दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांच्या रिक्षावर अचानक झाड पडले. यामध्ये प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रिक्षात अडकलेल्यांची सुटका केली. लीला काकडे (वय 50, रा. माळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या रिक्षामध्ये नम—ता पोळ, कमल अडिकामे, मीना पुरुषोत्तम पोळ तसेच त्यांच्याबरोबर एक लहान मुलगा प्रवास करीत होते.

दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी याबाबत माहिती दिली. मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तार कंपाउंडमध्ये असलेले एक मोठे झाड रिक्षावर पडले होते. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यांची रेस्क्यू व्हॅन पोहचल्यानंतर आतमध्ये एक महिला गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत दिसली. रिक्षामध्ये एकूण चार महिला व एक लहान मुलगा प्रवास करीत होते. त्यापैकी तीन महिला व लहान मुलगा (वय 3) यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले.

तसेच रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला. जवानांनी गंभीर जखमी महिलेची सुटका करून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 यामधून रुग्णालयात रवाना केले. मात्र, उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत रिक्षाचे व एका टपरीचेही नुकसान झाले. अग्निशमन अधिकारी रवींद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल संदीप घडशी आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भूषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी यामध्ये सुटका करण्यासाठी मदतकार्यात सहभाग घेतला. लहान मुलाचे व रिक्षाचालकाचे नाव समजू शकले नाही.

हेही वाचा

पुणे : अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जगाच्या तुलनेत भारतीय पाच तास अधिक ऐकतात गाणी

नगर : पाण्यासाठी महिला आक्रमक ; गटविकास अधिकार्‍यांना साकडे

Back to top button