नगर : पाण्यासाठी महिला आक्रमक ; गटविकास अधिकार्‍यांना साकडे | पुढारी

नगर : पाण्यासाठी महिला आक्रमक ; गटविकास अधिकार्‍यांना साकडे

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : आम्हाला पिण्याचे पाणी द्या, नाही तर पाथर्डी नगरपरिषद हद्दीत सामावून घ्या, अशी मागणी करत माळी बाभुळगाव येथील शिक्षक कॉलनीतील महिलांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांना सोमवारी साकडे घातले. माळीबाभुळगाव येथील शिक्षक कॉलनीतील बंजारा नगर, सतीआई, मोहटादेवी रोहौसिंग येथील महिलांनी गटविकास अधिकारी पालवे यांची भेट घेऊन पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. पंधरा दिवसांतून एकवेळ अन् तेही कमी वेळ पाणी मिळते. घरपट्टी व पाणीपट्टी वसुल केली जाते. टाकी बांधली आहे.

त्यामधे पाणी पडत नाही. बांधकामाचा खर्च करूनहीपाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकार्‍याचे दुर्लक्ष होत आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करुन प्रशासनाला जाब विचारू, असे महिला म्हणाल्या. विहिरीतून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. काही ग्रामस्थांनी हे पाणी नको, पैठणचे पाणी द्या, असा आग्रह धरला आहे. योजना जुनी झाल्याने मर्यादा येत आहेत. पुरवठा करणारे ठेकेदार, ग्रामपंचायत यांना सूचना केल्या आहेत. पाणी तातडीने दिले जाईल, असे डॉ.जगदिश पालवे म्हणाले.
यावेळी संगीता शेळके, मीना टेकाळे, अलका जाधव, वैशाली कुलकर्णी, अश्विनी जाधव, सुलोचना शिरसाट, कडुबाई दातीर, स्नेहल गिरी, वनीता गिरी, मनिषा चव्हाण, अनिता चव्हाण, बबिता चव्हाण, विमल राठोड, सीमा चव्हाण, अश्विनी घुंबरपे आदींसह महिला उपस्थित होत्या.

Back to top button