पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत उपाययोजनांची गरज | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत उपाययोजनांची गरज

अजय कांबळे

कुरकुंभ(पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, टोल कंपनी, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), महामार्ग व स्थानिक पोलिसांकडून उपाययोजनांची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे अजून किती जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

एखाद्या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतात, तेव्हा तिथे ’ब्लॅकस्पॉट’ तयार होतो. संबंधित विभागातील अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन उपाययोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष होते. हा पुढाकार प्रामाणिकपणे घेतला असता तर अनेकांचे जीव वाचले असते आणि पुढे ते वाचतीलही. अपघातात घरातील कर्ती व्यक्ती गेल्यावर काय अवस्था होते, हे त्या कुटुंबाशिवाय कोणीही सांगू शकत नाही.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, व्यसनी वाहनचालक, झोप न आवरणे अशा विविध कारणांमुळे अपघात वाढत आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेतून कारवाई होणे गरजेचे आहे. आरटीओ विभागाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेतले पाहिजे. वाहतूक पोलिसांकडून केवळ दंडात्मक कारवाईवर भर दिला जातो. एकावेळेस चार ते पाच वाहतूक पोलिस एकाच जागी थांबून केवळ कारवाई करतात. मात्र, त्यांनी या कामाबरोबर वाहनचालकांना शिस्त लावणे, नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे यावर काम केले पाहिजे.

वाहनांच्या वेगावर चाप लावण्यासाठी तशी यंत्रणा कायम तैनात ठेवण्याची गरज आहे. टोलवसुली करणार्‍यांना टोलशिवाय इतर गोष्टींचे घेणे-देणे नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. त्याकडे डोळेझाक केली जाते. बॅरिकेट्स व दुभाजकाच्या झालेल्या नुकसानीची दुरुस्ती केली जात नाही. याबाबत वरिष्ठांकडून विचारणा होत असेल की नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

हेही वाचा

ओडिशा रेल्‍वे अपघातप्रकरणी अधिकार्‍यासह पाच जण ताब्‍यात

ठाणे भाजपचाच बालेकिल्ला; भाजप नेत्यांचा सूर

वकील, पोलिस, साक्षीदारांमुळे देशात दीड कोटींवर खटले प्रलंबित

Back to top button