संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पाण्याची तळी; फुरसुंगी परिसरातील स्थिती

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पाण्याची तळी; फुरसुंगी परिसरातील स्थिती

फुरसुंगी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हडपसर-सासवड राष्ट्रीय महामार्गावरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 14 जून रोजी मार्गस्थ होणार आहे. परंतु, प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाची रस्तादुरुस्ती केल्यामुळे नुकत्याच पडलेल्या पावसामुळे या पालखी मार्गाच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याची तळी साठली आहेत. त्यामुळे वारकर्‍यांसाठी वाट बिकट होण्याची चिन्हे आहेत.

रस्तादुरुस्तीच्या नावाखाली साईडपट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने खोदून मातीमिश्रित मुरुम पसरविण्यात आला आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात पाऊस होत असल्याने खोदलेल्या साईडपट्ट्यांमध्ये पाणी साचून डबकी, दलदल व चिखल तयार झाला आहे. पालखी सोहळा सुरू झालेला असतानाही अद्यापही संबंधित खात्याकडून हे काम फारसे गांभीर्याने करण्यात आलेले नाही.

रस्त्याचे काम दर्जेदार झालेले नसल्याने अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. भेकराईनगर, पॉवरहाऊस, मंतरवाडी चौक, कापड मार्केट, उरुळी देवाची फाटा, दहावा मैल या ठिकाणी साईडपट्ट्यांमध्ये मातीमिश्रित मुरुम पसरविण्यात आला आहे. काही ठिकाणी या मुरुमामध्ये मोठे दगड-गोटेही दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक अनिल गोरडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

रस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या ठिकाणी अद्याप चांगल्या दर्जाचे काम झालेले नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेने चालणार्‍या वारकर्‍यांच्या पायांना दुखापत होण्याची भीती आहे. प्रशासनाने तत्काळ या साईडपट्ट्यांवर रोलर फिरवून साचलेले पाणी काढून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

– अमित हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, भेकराईनगर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news