तळेगाव ढमढे : जबरी चोरी, घरफोडी करणारा सराईत जेरबंद | पुढारी

तळेगाव ढमढे : जबरी चोरी, घरफोडी करणारा सराईत जेरबंद

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जबरी चोरी व घरफोडी करणार्‍या निखिल विजय पलांडे (रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) या सराईतास शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 62 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक कार असा 9 लाख 28 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. शिक्रापूर पोलिस ठाण्यात पलांडेवर आठ गुन्हे दाखल आहेत.

शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत सुनीता नवनाथ माने (वय 33, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी माने या शेतात खुरपणी करीत असताना चोरट्याने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र व कर्णफुले हिसकावून पळ काढला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मीतेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे शिक्रापूर पोलिसांना निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलिसांनी तपास केला असता सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी पलांडे याने केल्याचा संशय पोलिसांना आला.

पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेतला असता पलांडे हा वेषांतर करून व नाव बदलून लोणावळा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी पथक तयार करून पलांडे यास लोणावळा येथील रिसॉर्टमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने गेल्या सहा महिन्यांत शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केल्याचे कबूल केले. शिक्रापूर पोलिसांनी पलांडे यास अटक करत त्याच्याकडून 62 ग्रॅम वजनाचे दागिने व कार असा 9 लाख 28 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, पोलिस नाईक अमोल नलगे करीत आहेत.

हेही वाचा

नगर : कुकडीचे आवर्तन नऊ दिवस ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून आंदोलनाची दखल

नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

खडकवासला तलावात ’रेगाट्टा’चा समारोप

Back to top button