नगर : कुकडीचे आवर्तन नऊ दिवस ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून आंदोलनाची दखल

श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केलेल्या आंदोलनाची व पाठपुराव्याची दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ सुजय विखे यांनी घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सहाऐवजी नऊ दिवस करण्यात येणार आहे. नऊपैकी तीन दिवस विसापूर धरणात पाणी सोडण्यात येणार आहे.
गुरुवारी लोणीव्यंकनाथ येथे राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब नाहाटा यांनी कुकडीच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर पंढरपूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडीचे पाणी विसापूर धरणात सोडण्याची मागणी केली. मंत्री विखे यांनी मुख्य अभियंता धुमाळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पाणी सोडण्याबाबत सूचित केले. शुक्रवारी सकाळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार यांनी विसापूरमध्ये पाणी सोडण्याबाबत चर्चा केली.
त्यावर खासदार डॉ. सुजय विखे यांनीही पत्र देऊन कुकडीचे पाणी विसापूरमध्ये सोडण्याची मागणी केली. त्यावर हेमंत धुमाळ यांनी तीन दिवस वाढीव आवर्तन देण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये विसापूरमध्ये आवर्तन सोडण्यात येईल, असे नाहाटा यांनी सांगितले. दरम्यान, विसापूर खालच्या लोकांना पाणी मिळू नये, अशीच भूमिका तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची होती, असा आरोप नाहाटा यांनी केला.
आंदोलनास यश : राहुल जगताप
कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. तीत विसापूर तलावात आवर्तन सोडण्यात येणार नसल्याचे पत्र कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिले. त्यानंतर आम्ही आंदोलन करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांची भेट घेत या भागातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कुकडीचे पाणी विसापूर सोडण्याचा निर्णय झाला. आमदार बबनराव पाचपुते यांना घरी राहुन श्रेय घेण्याची सवय लागली आहे, असा टोमणाही जगताप यांनी लगावला.
हे ही वाचा :
Mira Road Murder : मृतदेह विल्हेवाटीसाठी गुगल सर्च; हत्येनंतर वेबसीरिजही पाहिली
ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध; एका परदेशी नागरिकासह चौघांना अटक