

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पिण्याच्या पाण्यासह अन्य मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी तांडा येथील महिलांनी पाथर्डी-नगर राष्ट्रीय महामार्गावर आंबेवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास महिलांनी आंदोलन करीत आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या, अशी मागणी करीत हंडे रस्त्यावर ठेवून महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले. जून महिना निम्मा संपत आला तरी पाऊस पडेना. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, कडक उन्हात दोन-दोन किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी महिलांना पायपीट होत आहे. ग्रामपंचायत मात्र घरपट्टी, पाणीपट्टी सक्तीने वसूल करते. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याने महिला व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत तिकडे पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला. मात्र, चालढकल केली जाते. त्यामुळे आज आंबेवाडी येथील तांड्यातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. निवडुंगे ग्रामपंचायत अंतर्गत आंबेवाडी तांडा येतो. तांड्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन मंजूर असून ते काम तत्काळ सुरू करावे, तसेच गावांतर्गत रस्ते, कूपनलिका दुरूस्त करुन कायम स्वरूपी चालू ठेवावे. तसेच इतर नागरी सुविधा उपलब्ध करुन द्यावा.
आंबेवाडी तांड्यासाठी सन 2016 रोजी महसुली गावाचा दर्जा प्राप्त माला आहे. त्यामुळे सर्व सरकारी अधिकार्यांनी तांड्यासाठी एक दिवस वेळ द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विसरवाडी यांनी आंदोलकांशी व ग्रामस्थांशी चर्चा करून आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आली. मयूर चव्हाण, कल्पना चव्हाण, योगेश राठोड, सुनील चव्हाण, सविता चव्हाण, संगीता राठोड, यशोदा चव्हाण, पारूबाई राठोड, कविता जाधव, मीरा राठोड, गीता पवार, कल्पना जाधव आदींसह ग्रामस्थांनी प्रशासनाला आंबेवाडी तांड्यातील पाण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंबेवाडीत स्वतंत्र टाकी व्हावी
केंद्राच्या जलजीवन मिशनमधून सुमारे दीड कोटी रूपयांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे काम निवडुंगे गावासाठी आहे. या योजनांतर्गत पिण्याचे पाण्याची टाकीचे कामे आंबेवाडी आणि निवडुंगेच्या मध्यभागी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सगळी कडे समान पाणी मिळेल. मात्र, तसे न होता निवडुंगे गावातच टाकी होत असल्याने आंबेवाडी तांड्याला पाणी मिळणार नाही. त्यामुळे याचे सर्वेक्षण होऊन पाणी टाकी व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मयूर चव्हाण यांनी केली.
हे ही वाचा :