कोल्हापुरात अंत्यसंस्कारासाठी इलेक्ट्रिक दाहिनी | पुढारी

कोल्हापुरात अंत्यसंस्कारासाठी इलेक्ट्रिक दाहिनी

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापुरातील स्मशानभूमीत मोफत होणार्‍या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च महापालिका करत आहे. पारंपरिक पद्धतीत लाकूड-शेणी यांचा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात धुरामुळे हवा प्रदूषण होते. तसेच काही वेळा लाकूड व शेणीची कमतरता भासते.

महापुरानंतर गंभीर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी इलेक्ट्रिक दाहिनी घेण्यात येणार आहेत. पंचगंगा आणि कसबा बावडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक दाहिनी बसविण्यात येणार आहेत. महापालिका स्वनिधीतून त्यासाठी 3 कोटी निधी खर्च करणार आहे. पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प या ठिकाणी महापालिकेच्या स्मशानभूमी आहेत. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे 160 किलो लाकूड आणि 500 शेणी लागतात. त्यासाठी महापालिका दरवर्षी 900 टन ते 1 हजार टन लाकूड आणि सुमारे 25 ते 30 लाख शेणी खरेदी करते. वर्षाला सुमारे 4 हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. पर्याय म्हणून बसविण्यात येणार्‍या इलेक्ट्रिक दाहिनीतही मोफत अंत्यसंस्काराची सेवा दिली जाणार आहे.

काही वर्षांपूर्वी महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीत डिझेल दाहिनी बसविली होती. परंतु, काही महिन्यांतच ती बंद पडली. त्याचा मेंटेनन्ससुद्धा करणे मुश्किलीचे बनले. आता त्याच ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्यात आली आहे. एका सामाजिक संस्थेने महापालिकेला मोफत गॅस दाहिनी बसवून दिली आहे. कोरोना कालावधीत अनेक मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांवरील ताण कमी झाला होता. परंतु, आता अनेक नागरिक पारंपरिक पद्धतीनेच म्हणजे
लाकूड-शेणी रचून त्यावर अंत्यसंस्काराला प्राधान्य देत आहेत.

शहरातील स्मशानभूमी

  • पंचगंगा स्मशानभूमी
  • कसबा बावडा स्मशानभूमी
  • कदमवाडी स्मशानभूमी
  • बापट कॅम्प स्मशानभूमी
  • एका मृतदेहावर अंत्यसंस्काराला 160 किलो लाकूड आणि 500 शेणी
  • वर्षाला 25 ते 30 लाख शेणी लागतात
  • वर्षाला 900 ते 1 हजार टन लाकूड लागते
  • महापालिकेकडून स्मशानभूमीसाठी वर्षाला 50 लाख खर्च

महापालिकेने पंचगंगा व कसबा बावडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक दाहिनी बसविण्यासाठी 2 कोटी 90 लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिक दाहिनी बसविण्यात येणार आहेत. लवकरच त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सध्या पंचगंगा स्मशानभूमीत असलेली गॅस दाहिनीसुद्धा दुरुस्त करून घेण्यात येत आहे.
– हर्षजित घाटगे, शहर अभियंता, महापालिका

Back to top button