दिव्यांगाचा कार्यालयात सत्याग्रह; हवेली तहसील प्रशासनाची धावपळ | पुढारी

दिव्यांगाचा कार्यालयात सत्याग्रह; हवेली तहसील प्रशासनाची धावपळ

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी याचना करणार्‍या दिव्यांग, विधवा, निराधारांना वेठीस धरले जात असल्याच्या निषेधार्थ जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष बाजीराव पारगे यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड, हवेली भागातील संतप्त दिव्यांग बांधवांसह विधवा महिलांनी शुक्रवारी (दि. 9) दुपारी 12 वाजता पुण्यातील हवेली तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजना विभागासमोर जोरदार घोषणाबाजी करत सत्याग्रह केला.

कार्यालयात गर्दीच्या वेळी ’छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ’दिव्यांगाना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत दिव्यांग कार्यालयात आले. ठाण मांडून सत्याग्रह सुरू केला, त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली. अचानक सुरू झालेल्या सत्याग्रहामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. दिव्यांग बांधवांना उद्धट वागणूक देणार्‍या कर्मचार्‍यांना संजय गांधी निराधार योजनेचे हवेली तालुका तहसीलदार अजित पाटील यांनी तत्काळ समज दिली. या वेळी उद्धट वर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांनी माफी मागितली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

संजय गांधी निराधार योजनेचे हवेली तालुका तहसीलदार अजित पाटील यांनी आंदोलकांच्या व्यथा समजावून घेतल्या. पुन्हा असे प्रकार घडणार अशी हमी दिव्यांग बांधवांना दिली. एन्याबलर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल शिनगारे, अश्विनी शितोळे, नीलेश जागडे, बालाजी मोरे, सचिन पवार, अमोल सोनोने, गणेश पंडित, नामदेव जाधव आदी दिव्यांग सत्याग्रहात सहभागी झाले होते.

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासकीय योजनांच्या लाभापासून शेकडो दिव्यांग, विधवा, निराधार वंचित आहेत. कर्मचारी बेफिकीर वर्तन करत आहेत, तर वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहे. हवेलीसारख्या उपनगरी तालुक्यात असे चित्र आहे तर ग्रामीण, दुर्गम भागात गंभीर चित्र आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रशासनाने दखल घ्यावी.

– बाजीराव पारगे, अध्यक्ष, भाजप दिव्यांग विकास आघाडी

दिव्यांग बांधव तसेच विधवा महिलांना योग्य मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

– नीलम थेऊरकर, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना

हेही वाचा

वेल्हे : पुलावरून दुचाकी कोसळून दोन भाविक गंभीर जखमी

वेल्हे : तोरणा, पानशेतला मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

पुन्हा बारामती तुंबली; आरोग्य विभागाकडून तत्परता

Back to top button