

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कुडजे -बहुली रस्त्यावरील मांडवी बुद्रुक (ता. हवेली) येथील संरक्षक कठडे नसलेल्या पुलावरून दुचाकी कोसळून दोन भाविक गंभीर जखमी झाले. हर्षवर्धन पाटोळे व सागर कदम (दोघेही रा. कात्रज, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मांडवी बुद्रुकच्या पुलावरून सहा ते सात फूट खोल ओढ्यात दुचाकी कोसळली. भाविक जीव वाचवण्यासाठी आक्रोश करीत होते. त्यांचा आवाज ऐकून विजय कदम, सागर शिर्के आदींनी त्यांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पाटोळे व कदम हे निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन घरी चालले होते. पुलाला कठडे नसल्याने
अंधारात दुचाकी थेट पुलावरून ओढ्यात कोसळली. यापूर्वीही या ठिकाणी वाहने कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मांडवी बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळील पुलाला कठडे बसविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. मांडवी बुद्रुकसह बहुली- कुडजे रस्त्यावरील सर्व पुलांना संरक्षक कठडे बसविण्यात यावेत, अन्यथा 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा मांडवी बुद्रुकचे सरपंच सचिन पायगुडे यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. एन . रणसिंग म्हणाले, अरुंद पुल पाडून त्या ठिकाणी बारा मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेसाठी पुलाच्या बाजूला वाळूची पोती उभी केली आहेत. अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
– अंकुश पडवळे, कृषिभूषण
हेही वाचा