पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचे पालखीमुळे फेरनियोजन | पुढारी

पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचे पालखीमुळे फेरनियोजन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून 12 आणि 13 जूनला होणार असल्याने या दिवशी होणार्‍या परीक्षांचे फेरनियोजन करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला. या दोन्ही दिवसांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, 14 ते 16 जूनदरम्यान पालखीचे प्रस्थान सासवड परिसरातून होणार असल्याने या कारणास्तव परीक्षा देता न येणार्‍या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले. विद्यापीठाच्या मार्च 2023च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 6 जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी केलेल्या विनंतीनुसार पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून 12 आणि 13 जूनला होणार असल्याने या दिवशीच्या परीक्षांचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता आहे.

त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील 12 आणि 13 जूनला होणार्‍या परीक्षांचे फेरनियोजन करण्यात येईल. तसेच सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. विशेष परीक्षेसाठीच्या अर्जासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज सादर करावेत. कोणत्याही कारणांमुळे विशेष परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेदेखील डॉ.काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

’नॅक’मधून आता श्रेणी हद्दपार ! विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

पुणे : …तर मिळकतकर थकबाकी भरू नका! महापालिकेचे आवाहन 

Monsoon Rain : पावसाची प्रतीक्षा संपली!

Back to top button