Monsoon Rain : पावसाची प्रतीक्षा संपली! | पुढारी

Monsoon Rain : पावसाची प्रतीक्षा संपली!

Monsoon Rain : देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असू देत, जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही कितीही महत्त्वाचे सामने सुरू असू देत, त्याकडे लक्ष असले तरी देशवासीयांचे खरे लक्ष असते ते पावसाकडे. काही वर्षांपूर्वी दरवर्षी 7 जूनला म्हणजे, मृग नक्षत्रावर हमखास हजेरी लावणारा पाऊस गेल्या काही वर्षांत लहरी बनला. त्याचमुळे त्याच्या आगमनाकडे डोळे लागून राहिलेले असतात. पुढच्या सगळ्या वर्षाचे नियोजन त्याच्यावर अवलंबून असते. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज काहीही असला, तरी प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावल्याशिवाय त्याची खात्री पटत नाही आणि हीच प्रतीक्षा संपली असून, जिथून त्याचा प्रवास सुरू होतो त्या केरळमध्ये आठवडाभर उशिरा म्हणजे 7 जूनला त्याने सुरुवात केली आहे.

हवामानद़ृष्ट्या मोठा अडथळा आला नाही, तर नजीकच्या काही दिवसांत त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तीन-चार दिवसांमध्ये तो तामिळनाडू, कर्नाटकात आणि पाठोपाठ महाराष्ट्राकडे त्याचा प्रवास सुरू होईल. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अल निनो’चा यंदा मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. परंतु, त्याची शक्यता केवळ 60 टक्क्यांपर्यंत आहे. देशवासीयांसाठी आणि विशेषतः शेतकरीवर्गासाठी खुशखबर म्हणजे, यंदाचा पाऊस सर्वसामान्य राहील आणि सरासरीच्या 96 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकेल. पावसाचा देशाच्या अर्थकारणावर परिणाम होत असतोच. परंतु, पावसाच्या अंदाजाचेही अर्थकारणावर परिणाम, दुष्परिणाम होत असतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याची घोषणा केली. त्यांनीही पाऊस सर्वसामान्य राहणार असल्याचे सांगितले. Monsoon Rain

मात्र, ‘अल निनो’च्या परिणामाबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितले. यंदा पाऊस केरळमध्ये आठवडाभर उशिरा सुरू झाला असला, तरी एकूण पावसाळ्यातील पावसावर त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे पावसाची गती थोडी मंदावल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जून ते सप्टेंबरअखेर देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, हा अंदाज एकूण परिस्थितीमध्ये महत्त्वाचा आहे. पावसाचा तसा राजकारणाशी संबंध नसतो; परंतु यंदाचा पाऊस राजकीयद़ृष्ट्याही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाऊस समाधानकारक झाला, शेती उत्पादन चांगले झाले, तर त्यामुळे एक व्यापक सकारात्मक वातावरण देशभरात तयार होते आणि ही परिस्थिती सत्ताधार्‍यांसाठी पोषक असते. याउलट पाऊस कमी पडला आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली किंवा अतिवृष्टीने महापूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली, तर सरकारसाठी ती त्रासदायक ठरू शकते. पाऊस अशारीतीने राजकारणावरही चांगला किंवा वाईट परिणाम घडवू शकतो आणि यंदाच्या पावसाला त्याचमुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. Monsoon Rain

यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजापासून वातावरण सकारात्मक आहे. हवामान बदलामुळे सगळे ऋतुचक्र बदलून गेले असून, अतिवृष्टी कधी होईल आणि दुष्काळाचे संकट कधी होरपळून काढेल, याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव किंवा ऐन हिवाळ्यात कोसळणारा पाऊस याचा शेतीवर मोठा परिणाम होत असतो आणि शेतीच्या उत्पादनातल्या चढ-उतारांनी बाजारपेठा अस्थिर होतात. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेला सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज दिलासादायक मानला जातो. गेली दोन वर्षे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान प्रचंड उष्म्याने देशवासीयांना होरपळून काढले. सव्वाशे वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उष्णतेची लाट देशाने गतवर्षी अनुभवली. देशाच्या काही भागांमध्ये 50 अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला होता. त्याचा गव्हाच्या पिकांवर परिणाम झाला आणि उत्पादन निम्म्यापर्यंतच आले. 2019-20 मध्ये देशात दोन कोटी टन आंब्याचे उत्पादन झाले होते आणि 50 हजार टन आंब्याची निर्यात झाली होती, ही निर्यात 2021-22 मध्ये जवळपास निम्म्यावर आली. Monsoon Rain

रब्बीनंतर खरिपाच्या काळातही पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. महाराष्ट्रातही लहरी हवामानाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते. गेल्यावर्षीही हवामानशास्त्र विभागाने सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असताना, अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज हा अखेरीस अंदाजच असतो, हे लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे असते. शेती समृद्ध, तर देश समृद्ध असतो आणि या शेतीची समृद्धी शेवटी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे चांगला पाऊस पडण्याची आनंदवार्ता देशाच्या समृद्धीची आस बाळगून असलेल्या सगळ्यांसाठीच आनंददायक असते. शेतीच्या पलीकडे महत्त्वाचा असतो, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. मुबलक पाऊस पडला, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो; अन्यथा लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सरकारी यंत्रणेला आपली शक्ती पाणीपुरवठ्यासाठी लावावी लागते. उद्योगांसाठीही पाणीटंचाई निर्माण होऊन औद्योगिक उत्पादनांवरही त्याचा परिणाम होऊ शकत असतो. निसर्गावर कधीच कुणाला हुकूमत गाजवता येत नाही आणि तो कधीच कुणाच्या नियंत्रणात येत नसल्यामुळे पूर्वानुभव आणि काही शास्त्रीय परिमाणांच्या आधारे अंदाज बांधण्यापलीकडे काही करता येत नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल, असे सांगितले जाते. Monsoon Rain

परंतु, तो कधी कमी-जास्त पडेल हे सांगता येत नाही. सरासरीएवढा किंवा पुरेसा पाऊस होणे महत्त्वाचे असतेच; परंतु तो शिस्तशीर आणि शेतीसाठीच्या आवश्यकतेनुसार दमादमाने पडावा लागतो. त्याचा अंदाज अनेकदा हवामान विभागाला येत नाही. पावसात मोठे खंड पडण्याच्या शक्यतेबरोबरच अचानक आणि तीव— पावसाची शक्यता असते. अशा सगळ्या शक्यता गृहीत धरूनही पावसाचे आगमन हेच शेतकर्‍यांबरोबरच सर्वच घटकांसाठी महत्त्वाचे असते. केरळमध्ये पावसाला सुरुवात झाली असून, त्याचा प्रवास सुरू झाला आहे. लवकरच तो आपल्याकडे येईल, आपणही त्याच्या स्वागतासाठी सज्ज राहायला हवे. Monsoon Rain

Back to top button