पुणे : …तर मिळकतकर थकबाकी भरू नका! महापालिकेचे आवाहन  | पुढारी

पुणे : ...तर मिळकतकर थकबाकी भरू नका! महापालिकेचे आवाहन 

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वत: राहत असलेल्या आणि मागील थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांनी केवळ चालू वर्षाचे (2023-24) बिल भरावे. यासोबतच पीटी 3 फॉर्म भरून द्यावा; जेणेकरून बिलांमध्ये दिसणारी थकबाकी दिसणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, शहरातील 10 लाख मिळकतींची बिले पोस्टाने पाठविण्यात आली असून काही दिवसांत नागरिकांना मिळतील; शिवाय महापालिकेच्या संकेतस्थळावरही बिले उपलब्ध होतील.
महापालिकेने 40 टक्के मिळकतकर सवलत पूर्ववत सुरू केली आहे. प्रामुख्याने 2019 नंतर आकारणी झालेल्या आणि जीआयएस सर्वेक्षणामध्ये ज्यांची सवलत काढून घेण्यात आली, अशा चार लाख मिळकतींच्या  2023-24 या आर्थिक वर्षीच्या मिळकतकरामध्ये 40 टक्के रक्कम कमी केल्याचे महापालिकेने सांगितले.  प्रत्यक्षात बिल हातात पडल्यानंतर ज्यांनी मागील वर्षीपर्यंतचा कर भरला असतानाही मागील चार वर्षांची 40 टक्क्यांची थकबाकी बिलांमध्ये दिसत आहे.
काही करभरणा केंद्रांवरील कर्मचारीदेखील सर्व रक्कम भरण्यासाठी आग्रह करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्यानंतर करआकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी कर विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत, शिवाय नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांनाही सूचना केल्या आहेत.

महापालिकेच्या सूचना पुढीलप्रमाणे

  • 2019 नंतर आकारणी झालेल्या बिलांमध्ये 2023-24 वर्षीच्या बिलात करपात्र रकमेत 40 टक्के सवलत देण्यात आली आहे. मिळकतीचा वापर स्वत: करत असल्यास पीटी 3 फॉर्म 15 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा.
  • 2022-23 पर्यंत सर्व कर भरल्यानंतरही बिलांमध्ये 2019 पासूनची 40 टक्क्यांनुसार थकबाकीची रक्कम दिसत असल्यास थकबाकीची रक्कम भरू नये. केवळ चालू वर्षीचे बिल भरावे.
  • जीआयएस सर्वे अंतर्गत 1 एप्रिल 2018 पासून ज्या जुन्या मिळकतींची सवलत काढून घेतली आहे. त्यांनाही फरकाच्या रकमेच्या बिलांसह चालू वर्षीचे बिल पाठविले आहे. त्या मिळकतधारकांनी देखील स्वत: राहात असल्यास पीटी 3 फॉर्म भरून द्यावा व फक्त चालू वर्षीचे बिल भरावे.
  • पीटी 3 फॉर्मसोबत सोसायटीच्या चेअरमनचे पत्र बंधनकारक नाही.
  • पुरावे म्हणून रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, सोसायटीचे नाहरकत पत्र यापैकी कुठलीही दोन कागदपत्रे जोडावीत. ज्यांच्या नावे शहरात दोन मिळकती आहेत, त्यांनी दुस-या मिळकतीची करपावती जोडावी.
  • पीटी3 फॉर्मनुसार सर्व मिळकतींचे अधिकारी व कर्मचा-यांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर बिलांवरील थकबाकी  दिसणार नाही.
  • मागील चार वर्षे संपूर्ण कर भरलेल्या मिळकतधारकांना पुढील चार बिलांमध्ये चार टप्प्यात वजावट देण्यात येईल.
  • भाडेकरू असल्यास चार वर्षांच्या थकबाकीसह सर्व बिल भरणे बंधनकारक आहे.
  • पीटी 3 फॉर्म 15 नोव्हेंबरपर्यंत न भरल्यास भाडेकरू समजून 100 टक्के कर आकारला जाईल.
हेही वाचा

Back to top button