नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी | पुढारी

नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील तब्बल ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली. प्रत्येक विभागात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार समोर आला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या सहाही विभागांतील सोनोग्राफी सेंटर्सची नियमित पाहणी पथकाकडून केली जात असते. त्याचाच एक भाग म्हणून सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सोनोग्राफी सेंटर्सची पाहणी केली. अवैधपणे सोनोग्राफी सेंटर्सच्या माध्यमातून चोरट्या पद्धतीने गर्भलिंग निदान केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. स्त्री भ्रूण हत्या हा गंभीर प्रकार आजही घडत असल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय विभागातून वर्षातून दोनदा सर्व सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली जाते. दरम्यान, शहरात एकूण ३४४ सोनोग्राफी सेंटर्स असून, काही सेंटर्स विनापरवाना चालत असल्याचीही माहिती समोर येत आहे. या सेंटरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा ‘वॉच’ आहे.

पथकाकडून अचानक धाड

शहरातील सोनोग्राफी सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच, महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकाकडून त्या सेंटरवर धाड टाकली जाते. या पथकाने त्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाते. बऱ्याचदा सोनोग्राफी सेंटरला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाते.

एखाद्या सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भनिदान केले जात असल्याचे एखाद्या नागरिकाच्या निर्दशनास आले असेल, तर त्यांनी सुजाण नागरिक म्हणून १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, मनपा

हेही वाचा :

Back to top button