पुणे : तरुणीला गिफ्टचे प्रलोभन पडले तब्बल एवढ्या लाखाला ! | पुढारी

पुणे : तरुणीला गिफ्टचे प्रलोभन पडले तब्बल एवढ्या लाखाला !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका तरुणीला जाळ्यात खेचले. त्यानंतर आपण विदेशात असल्याची बतावणी करीत तेथून महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगून ते विमानतळावर अडकल्याची बतावणी करीत चार्जेसच्या नावाखाली तब्बल 13 लाख 53 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. अशाच प्रकारे त्यांनी इतरांचीदेखील फसवणूक केली असून, एकूण 22 लाख 83 हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

याप्रकरणी, खराडी येथील 29 वर्षीय तरुणीने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 27 ऑक्टोबर 2022 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची शादी डॉट कॉमच्या माध्यमातून सायबर चोरट्यासोबत परिचय झाला होता. त्याने विराट पटेल असे नाव धारण करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तो विदेशात चांगल्या कंपनीत नोकरीला असून, त्याने काही मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून तिला पाठवल्याचे सांगितले.

मात्र, वस्तू महागड्या असल्यामुळे दिल्ली एअरपोर्ट येथे कस्टममध्ये अडकल्या असल्याचे सांगितले. त्या सोडवून घेण्यासाठी काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले. तरुणीला सायबर चोरट्याचे बोलणे खरे वाटले. तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो सांगेल त्याप्रमाणे वेळोवेळी 13 लाख 53 हजार रुपये भरले. कस्टम अधिकारी म्हणून सायबर चोरटेच तरुणीसोबत संपर्क साधत होते.

दरम्यान, पैसे भरूनदेखील कोणतेही गिफ्ट मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले. दरम्यान, आरोपींनी अशाच प्रकारे इतरांनाही गंडा घातला असून, एकूण 22 लाख 83 हजार रुपये आपल्या खात्यावर वर्ग करून घेतले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक जानकर करीत आहेत.

हेही वाचा

Kolhapur News | कोल्हापुरातील इंटरनेट सेवा पूर्ववत

नवापूरमधील बांधकामांवर बुलडोझर ; स्थानिकांचा आक्रोश !

पुणे रेल्वे स्थानकावरून महिन्यात 33 मुलांची सुटका

Back to top button