नवापूरमधील बांधकामांवर बुलडोझर; स्थानिकांचा आक्रोश ! | पुढारी

नवापूरमधील बांधकामांवर बुलडोझर; स्थानिकांचा आक्रोश !

विरार; राजेश सावंत :  विरार पश्चिमेकडील अर्नाळा- नवापूर येथे नोकरी धंदा नसल्यामुळे स्वतः व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी गावातील काही तरुणांनी समुद्रकिनाऱ्यालगत स्वतः कसत असलेल्या फुलांच्या बागेत फार्म हाऊस सुरू केले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ लागला. पण सरकारी यंत्रणेला हाताशी धरून स्वतःची पोटं भरणाऱ्या बनावट एनजीओच्या तक्रारीमुळे या फार्म हाऊसवर सरकारी बाबुंनी बुलडोजर फिरवला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले..

या कारवाईमुळे नवापूर गावांतील घरांमध्ये मंगळवारी चूलही पेटल्या नाहीत. आपला फार्म हाऊस पत्यासारखा कोसळत असल्याचे पाहून अश्रूचा बांध फुटला. आया- बहिणी चक्कर येऊन जमिनीवर अक्षरशः कोसळल्या आणि गावात स्मशान शांतता पसरली. विरार अर्नाळा येथे नवापूर टुमदार गाव आहे. गोव्याला लाजवेल अशी निसर्गसंपदा लाभलेल्या नवापूर गावाला समुद्रकिनाराही लाभला आहे. या गावाची लोकवस्ती जेमतेम दोन ते अडीच हजार असून येथील गावकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. यात प्रत्येकाच्या भाजी व फुलांच्या बागा आहेत. काहीजण सोडले तर इतरांचा उदरनिर्वाह फुल व भाजीच्या शेतीवरच चालतो.

कोरोना काळात हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे या गावातील तरुणांनी आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी समुद्रकिनारा लगत असलेल्या आपल्या भाजी फुलांच्या मळ्यात फार्म हाऊस सुरू करण्याचा निर्णय घेतला. पैसे नसल्यामुळे अनेकांनी नातेवाईक व बँकातून कर्ज काढून फार्महाऊस उभारले.

फार्म हाऊस उभारल्यानंतर काही सरकारी बाबूंचा त्रासही झाला. पण काही दिवसांतच या व्यवसायाला कोणाची तरी दृष्ट लागली. अतिक्रमणच्या तक्रारी करून स्वतःचे पोट भरणारे व स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्या बनावट एनजीओनी नवापूर गावातील या फार्म हाऊसची सरकार दरबारी तक्रार केली.

शेकडो अतिक्रमणांकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारी बाबूंनी मात्र या तक्रारीची गंभीर दखल घेतली. या फार्म हाऊसवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय असताना आजूबाजूला उभारलेल्या व राजकीय वरदहस्त असलेल्या फार्महाऊस व पंचतारांकित रिसॉर्टकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. अवघ्या चार फार्महाऊसची तक्रार आल्याने ही कारवाई केल्याचे सरकारी बाबूंकडून सांगण्यात आले.

Back to top button