Kolhapur News | कोल्हापुरातील इंटरनेट सेवा पूर्ववत | पुढारी

Kolhapur News | कोल्हापुरातील इंटरनेट सेवा पूर्ववत

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : कोल्हापुरातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. येथील इंटरनेट शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरु झाले. विविध टेलिकॉम कंपन्यांनी सकाळी १० वाजल्यापासून इंटरनेट सेवा सुरु करण्यास सुरुवात केली. कोल्हापुरातील तणावानंतर सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले होते. त्यानंतर कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. (Kolhapur News)

औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचा स्टेटस मोबाईलवर ठेवल्याच्या घटनेनंतर बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर दुसर्‍या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट कधी सुरु होणार? याची लोक वाट पाहात होते. गुरुवारी रात्री इंटरनेट सुरु होईल यासाठी काही लोक रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहिले होते. पण शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून इंटरनेट सेवा पूर्ववत झाली.

स्टेटस प्रकरणावरून चार ते पाच दिवसांपासून शहर धुमसत होते. स्टेटस लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे पाहून मंगळवारी दुपारपासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करून बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या बंदवेळी जमाव हिंसक बनला व त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता होती. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण पूर्वपदावर आले. छोटे व्यावसायिक, फेरीवाल्यांनी सकाळी सातपासूनच आपली दुकाने थाटली. ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, महापालिका परिसर, बिंदू चौक, भाऊसिंगजी रोडवर सकाळपासूनच व्यवसाय सुरू झाले. (Kolhapur News)

हे ही वाचा :

 

Back to top button