पुणे : खा. डॉ. अमोल कोल्हे ‘अ‍ॅक्टिव्ह’; महापालिका आयुक्तांची घेतली भेट | पुढारी

पुणे : खा. डॉ. अमोल कोल्हे ‘अ‍ॅक्टिव्ह’; महापालिका आयुक्तांची घेतली भेट

पुणे/हडपसर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित केल्यानंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. डॉ. कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघातील हडपसर व इतर गावांमधील प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची गुरुवारी भेट घेतली.
महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये मांजरी येथील उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करणे, पाणी, रस्ते, वीज आदींसह मूलभूत प्रश्न सोडविण्यावर चर्चा झाली. या वेळी आ. चेतन तुपे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, ’शिरूर लोकसभा मतदारसंघात काही हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाची कामे झाली आहेत. शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा डीपीआय सादर झाला आहे. त्याची पाहणी मी आणि खा. सुप्रिया सुळे संयुक्तपणे करणार आहोत.

इंद्रायणी मेडिसीटी प्रकल्प उभा करत आहोत, माजी पालकमंत्री अजित पवार यांनी जागाही दिली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर त्याला खीळ बसली होती, मात्र आता काम सुरू झाले आहे. पुणे-नाशिक हायवेवरची वाहतूक कोंडी सोडवणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे. त्याला शरद पवारांच्या नेतृत्वात पुढील अधिवेशनात मंजुरी मिळेल.’

‘मी सक्रिय नसतो तर मतदारसंघात 30 हजार कोटींची कामे होऊ शकली नसती. मी दिलेल्या तीन आश्वासनांतील दोन आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यातील एक बैलगाडा शर्यतीचा प्रश्न तडीस गेला आहे. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा, यासाठी मी राजकीय जोडे बाजूला ठेवून अमित शहांना भेटलो. कोणी काही म्हटले तरी काही फरक पडत नाही. शेवटी आंब्याच्या झाडाला लोक दगडं मारतात, अशोकाच्या झाडाला नाही,’ असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

कोणी समर्थन करायचे नाही

’ज्यानं बापाला हालहाल करून मारले त्या औरंगजेबाचे कोणीही समर्थन करणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने औरंगजेबच्या समर्थनाचे वक्तव्य केलेले नाही. वढू-तुळापूरचा जीर्णोद्धार करणारे नेते अजित पवार आहेत. फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय,’ असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला.

हेही वाचा

असा दिसत होता तीन हजार वर्षांपूर्वीचा राजा!

सांगली : चार दरोडेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध

अधिकारी सुस्त अन् ठेकेदार बिनधास्त ! नगरमधील मिरजगावात रखडलेले रस्त्याचे काम

Back to top button