अधिकारी सुस्त अन् ठेकेदार बिनधास्त ! नगरमधील मिरजगावात रखडलेले रस्त्याचे काम | पुढारी

अधिकारी सुस्त अन् ठेकेदार बिनधास्त ! नगरमधील मिरजगावात रखडलेले रस्त्याचे काम

मिरजगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  सात कोटी खर्च करून, एक किलोमीटरचे काम दोन वर्षांपासून सुरूच. मुख्य रस्त्याचे काम रखडलेलेच, सततची वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य, गटारांची सुटलेली दुर्गंधी, यामुळे मिरजगावकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. नगर-सोलापूर महामार्गावर असलेल्या मिरजगावातील रस्ता पूर्वीपासून कायमच चर्चेत राहिला आहे.

रस्त्यावरील खड्डे, सततची वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण यामुळे येथील रस्त्याचे काम व्हावे, यासाठी मिरजगावचे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी अनेक वेळा आंदोलने केली. रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करून गांधीगिरी केली होती. अनेक वेळा मागणी झाल्यानंतर मिरजगावातील एक किलोमीटरच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले. एक किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण, रस्ता दुभाजक व दोन्ही बाजूंनी गटार, असे काम मंजूर करण्यात आले. यासाठी सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. तो कालावधीही संपला आहे. एक किलोमीटरच्या कामाला दोन वर्षे लागली तरी देखील हे काम अपूर्ण आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे मिरजगाव येथील रहिवासी, व्यापारी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शिवाय गटारीचे काम अपूर्ण आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने मिरजगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ता दुभाजकाचे काम अपूर्ण आहे. यामुळे वृक्षारोपण करण्यात आले नाही. सूचना फलक लावलेले नाहीत. गतिरोधक नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच खचला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण राहिलेले आहे. वाहनचालक नियम पाळत नाहीत, यामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. या प्रश्नाकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

येथील अनेक समस्यांमुळे मिरजगावकरांची डोकेदुखी वाढली आहे. हे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ठेकेदार बडा असल्याने या कामाबाबत त्याला जाब विचारण्याचे कोणीही धाडस करत नाही.

दोन्ही आमदारांचेही दुर्लक्ष
कर्जत-जामखेडला दोन आमदार आहेत. त्यांचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर सतर्क आहेत. कामाचे श्रेय कोणी घ्यायचे, यावर वादंग सुरू असते. मग या कामाकडे दोन्ही लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न मिरजगावकरांना पडला आहे.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/latest/565058/kolhapur-internet-service-when-will-internet-start-in-kolhapur/ar

https://pudhari.news/maharashtra/pune/565045/succumb-to-superstition-and-try-for-the-third-time/ar

https://pudhari.news/national/565013/there-is-talk-of-holding-lok-sabha-elections-along-with-the-vidhan-sabhas-of-the-three-states/ar

Back to top button