सांगली : चार दरोडेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध | पुढारी

सांगली : चार दरोडेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील रिलायन्स ज्वेल्सवर गोळीबार करीत भरदिवसा सशस्त्र दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस यंत्रणा खूप मेहनत घेत आहे. हैदराबाद येथून बुधवारी ताब्यात घेतलेल्या सहाजणांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे सांगलीतून 17 जणांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पेढीवर दरोडा टाकलेले चार दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाले होते. त्यांची रेखाचित्रे गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. रविवार, दि. 4 रोजी सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून पंधरा कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. घटनेच्या दुसर्‍यादिवशी टोळीने गुन्ह्यात वापरलेली कार भोसे (ता. मिरज) येथे शेतात, तर दुचाकी मिरजेतील समतानगरमध्ये सापडली होती.
दोन्ही वाहनांचे क्रमांक बोगस होते. इंजिन व चेस क्रमांकावरून पुढील तपासाला दिशा देण्यात आली. टोळीने ही कार ठाणे येथून वाहन
बाजारातून, तर दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गामधून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांचे पथक या दोन्ही ठिकाणी तिथे जाऊन आले.

शनिवार 3 जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता टोळीतील एकजण पेढीत गेला होता. तोही सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चित्रीत झाला होता. तो हैदराबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्याचे नाव गणेश आहे. त्याच्यासह सहाजणांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना घेऊन गुरुवारी सकाळी पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले. सहाजणांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे सांगलीतील 17 जण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

‘फॉरेन्सिक टीम’ दाखल

दरोेड्याच्या तपासासाठी पोलिसांनी गुरुवारी ‘फॉरेन्सिक टिम’ची मदत घेतली. ‘टीम’ने रिलायन्स ज्वेल्सला भेट दिली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारातील पुंगळी, ठसे व अन्य काही बाबींची चौकशी करून त्या ताब्यात घेतल्या. दरोड्यात वापरलेल्या कारची तपासणी केली.

Back to top button