असा दिसत होता तीन हजार वर्षांपूर्वीचा राजा! | पुढारी

असा दिसत होता तीन हजार वर्षांपूर्वीचा राजा!

कैरो : इजिप्तमधील प्राचीन फेरो म्हणजेच राजांपैकी तुतानखामनविषयी लोकांना बरेच कुतुहल असते. याचे एक कारण म्हणजे सोन्या-चांदीचा खजिना असलेल्या तुतानखामनच्या मकबर्‍याचा 1922 मध्ये लावण्यात आलेला शोध. त्यावेळी जो खजिना सापडला त्याची आजही चर्चा होत असते. अगदी कोवळ्या वयातच हा तीन हजार वर्षांपूर्वीचा राजा मृत्युमुखी पडला होता. आता तो कसा दिसत होता याची एक कल्पना करण्यात आली आहे. त्याच्या कवटीचा आधार घेऊन त्याचा चेहरा कसा दिसत असेल याचे हे मॉडेल बनवण्यात आले आहे.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच तुतानखामन राजा झाला होता. दशकभराने म्हणजेच इसवी सनपूर्व 1323 मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत तो राजसिंहासनावर होता. तो कसा दिसत होता याबाबत अजूनही वाद आहेत. मात्र, आता त्याच्या चेहर्‍याचे एक नवे अनुमान काढण्यात आले आहे. त्यावरून ही ऐतिहासिक व्यक्ती कशी दिसत होती याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील मायकल हॅबिच यांनी सांगितले की तुतानखामनबाबत संशोधकांना नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. अर्थात हे कुतुहल त्याच्या खजिन्याने भरलेल्या मकबर्‍यामुळेच आहे असे नव्हे तर या राजाने इजिप्तच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात दहा वर्षे राज्य केल्यानेही आहे.

तुतानखामनचा बाप फेरो अखेनतेन हा एक क्रांतिकारक राजा होता. त्याने अतेन या सूर्यदेवतेशिवाय अन्य देवतांची पूजा बंद पाडली होती. मात्र, तुतानखामनने आपल्या बापाचा मार्ग पत्करला नाही. त्याने पुन्हा जुन्या देवतांची पूजा सुरू केली. हा राजा कसा दिसत होता याचेही कुतुहल होते. आता त्याचे फॉरेन्सिक फेशियल रिकन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. या त्रिमितीय फेशियल अ‍ॅप्रॉक्झिमेशनने त्याच्या रूपाविषयीचा अंदाज येऊ शकतो. त्याच्या कवटीचे सीटी स्कॅन करून त्याआधारे हे मॉडेल बनवण्यात आले.

Back to top button