अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात; तीन परप्रांतीय जागीच ठार | पुढारी

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात; तीन परप्रांतीय जागीच ठार

आळेफाटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात चौगुले वस्तीजवळ मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी (दि. ७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. हे अपघातग्रस्त परप्रांतीय असून, आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत कामानिमित्त आलेले आहेत. मयतांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे. अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय २१), चाहात बाबुराव (वय-१७) आणि संजीव कुमार (वय २४, सर्व राहणार उत्तरप्रदेश) अशी आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने (एमएच ०४ एचवाय ८७३०) दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सकाळी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा

निरा : जिल्हाधिकार्‍यांनी एनएचआयच्या अधिकार्‍यांना सुनावले खडेबोल

नगर : वाघोली ग्रामपंचायत राज्यात प्रथम ; ‘माझी वसुंधरा’ अभियानात दीड कोटीचा पुरस्कार

पळसदेव : पंधरा जूनपासून शाळा होणार सुरू

Back to top button