निरा : जिल्हाधिकार्‍यांनी एनएचआयच्या अधिकार्‍यांना सुनावले खडेबोल | पुढारी

निरा : जिल्हाधिकार्‍यांनी एनएचआयच्या अधिकार्‍यांना सुनावले खडेबोल

निरा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्यांची सूचना देऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) अद्यापही कसलीच दुरुस्ती केली नाही, हे पाहून साता-याचे जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी अवाकच झाले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना जाब विचारत चांगलेच खडे बोल सुनावले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 18 जुनला पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी पालखी सोहळा निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून निरा स्नानाकरिता मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर साताराचे जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांनी बुधवारी (दि. 7) दुपारी पावणेचार वाजता निरा नदीवरील दत्त घाट, दोन्ही पुलांसह निरा स्नानाच्या व नदीच्या स्वच्छतेच्या तयारीचा आढावा घेतला.

सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, वाई-खंडाळ्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, फलटणचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अभिजित औटी, खंडाळ्याचे प्रभारी तहसीलदार चेतन मोरे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पाडेगावचे माजी सरपंच विजयराव धायगुडे, शंकरराव मर्दाने, गजानन माने, उपसरपंच संतोष माने, ग्रामसेविका साधना जाधव, रमेश धायगुडे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दि. 28 मे रोजी निरा नदीवरील बि—टिशकालीन पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती करण्याच्या स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या होत्या. मात्र, पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही प्राधिकरणाकडून त्याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आल्याने जयवंशी यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या निरा स्नानस्थळी भेट देणार

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी (दि. 8) सासवड ते पंढरपूरपर्यंतच्या मु्क्कामस्थळांना भेट देऊन तयारीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहेत. या वेळी ते निरा नदीवरील माउलींच्या पादुकांना घालण्यात येणार्‍या स्नानाच्या स्थळालादेखील भेट देत पाहणी करणार आहेत.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यातील 60 तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू

पुणे : कार्ल्यात एमटीडीसीचे 38 एकरांवर चाणक्य केंद्र

Nashik Crime : दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड

Back to top button