पुणे : जी 20 साठी महापालिकेचे ‘होऊ दे खर्च!’ | पुढारी

पुणे : जी 20 साठी महापालिकेचे ‘होऊ दे खर्च!’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी 20 परिषदेनिमित्त केल्या जाणार्‍या सुशोभीकरणासाठी विदेशी प्रजातीची झाडे आणि कुंड्यांसाठी महापालिकेकडून तब्बल एक कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इतर वेळी एकसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी एकच निविदा राबविणार्‍या प्रशासनाने उद्यान विभागाच्या वतीने करण्यात येणार्‍या सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदांचे तुकडे केले आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाला जी 20 साठी 3 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

हा निधी नगर रस्ता, सोलापूर रस्ता, पाषाण रस्ता, खराडी बायपास, बाणेर या रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर कुंड्या ठेवण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. यापैकी एक निविदा मोठ्या आकाराच्या 1760 कुंड्या खरेदीची असून, दुसरी निविदा साधारण तेवढ्याच रकमेची आणि तेवढीच सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या विदेशी झाडांच्या खरेदीची आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सटेल प्लामची 200 झाडे किंमत 1 हजार 800 प्रतिझाड, रॅफिस प्लाम 100 झाडे प्रतिझाड 4 हजार, बोगन वेल 200 झाडे प्रतिझाड 5 हजार, फिकस स्टार लाइट 250 झाडे प्रतिनग 4 हजार, फिकस ब्लॅक 250 झाडे प्रतिनग 5 हजार, अ‍ॅरका प्लाम 280 झाडे प्रतिनग 800 रुपयांप्रमाणे ही झाडे खरेदी करण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कर धरून या झाडांसाठी एकूण 49 लाख 96 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुणे शहरामध्ये आयोजित होणार्‍या जी 20 बैठकीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट करणे आणि रोपे पुरविणे हे अंदाजपत्रकीय अर्थशीर्षकातून खरेदी करण्यात येणार आहे. 50 लाख रुपयांच्या कुंड्यासुध्दा यासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.

दरम्यान, एस्टिमेट कमिटीपुढे जाणे टाळण्यासाठी उद्यान विभागाच्या वतीने जी 20 परिषदेसाठीच्या एकसारख्याच कामाच्या निविदा 50 लाख रुपयांच्या आतमध्ये राहतील असे विभाजन केले आहे. 50 लाख रुपयांच्या आतील कामे वरिष्ठ अभियंत्यांच्या अखत्यारीत, तर 1 कोटीपर्यंतची कामे ही विभागप्रमुखांच्या अखत्यारीत मंजूर होतात. त्यासाठी एस्टिमेट कमिटीपुढे जाण्याची गरज नसते.

तुकडे केलेल्या कामांच्या निविदा

1) सोलापूर रस्त्यावरील दुभाजक झाडांची छाटणी आणि लागवड व सुशोभीकरण करणे – 49 लाख 70 हजार
2) पाषाण रस्ता, बाणेर रस्ता सुशोभीकरण करणे – 49 लाख 98 हजार
3) खराडी बायपास ते सोलापूर रस्ता सुशोभीकरण करणे – 97 लाख 14 हजार
4) नगर रोड सुशोभीकरण करणे – 98 लाख 65 हजार
5) जी 20 साठी रोपे पुरविणे – 49 लाख 96 हजार
6) जी 20 कुंड्या पुरविणे – 49 लाख 22 हजार

जी 20 बैठकीनिमित्त शहरातील रस्त्यांचे कायमस्वरूपी सुशोभीकरण करण्यासाठी झाडे आणि कुंड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. ही झाडे आणि कुंड्यांचा आकार मोठा असल्यामुळे किंमत जास्त आहे. ही झाडे 2 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतची आहेत. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावरदेखील सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्या ठिकाणी कुंड्या ठेवण्यात येणार आहेत, तसेच दुभाजकांवर फ्लॉवर बेड्स करण्यात येणार आहेत.

अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख

हेही वाचा

पुणे : राज्य बँकेस 47 कोटींचे उत्पन्न : विद्याधर अनास्कर

नाशिक : कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धागेदोरे?

डॉ. प्रदीप कुरुलकरची हेरगिरी : एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये !

Back to top button