पुणे : राज्य बँकेस 47 कोटींचे उत्पन्न : विद्याधर अनास्कर | पुढारी

पुणे : राज्य बँकेस 47 कोटींचे उत्पन्न : विद्याधर अनास्कर

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सन 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 3 हजार 337 कोटी 94 लाख रुपयांचा विदेश विनिमय व्यवहार (फॉरेक्स) केला असून, त्यातून 47 कोटींइतके विक्रमी उत्पन्न मिळाल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. बँकेने कोव्हिड महामारी, जागतिक मंदीसदृश्य परिस्थिती तसेच रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर फॉरेक्स व्यवसायात केलेली नेत्रदीपक वाढ ही सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.

राज्य बँकेच्या गेल्या 5 वर्षांमध्ये विदेश विनिमय व्यवहारात सातत्याने वाढ होत आहे. त्यापैकी गेल्या 2 वर्षांत बँकेने 9 हजार 408 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार हे हबीब अमेरिकन बँकेमध्ये केलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य बँकेच्या फॉरेक्स व्यवसायात आणखी वाढ होण्यासाठी व फॉरेक्स वैधानिक बाबींसंदर्भात हबीब अमेरिकन बँकेचे उपाध्यक्ष जॉनथन लिन व व्यवस्थापक लीना शहा यांनी नुकतीच राज्य बँकेस भेट दिली.

या वेळी राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे व फॉरेक्स व्यवहारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत राज्य बँकेच्या मार्च 2023 अखेरीस आर्थिक स्थितीची माहिती संबंधित प्रतिनिधींना दिली. राज्य बँकेची आर्थिक स्थिती व बँकेने आर्थिक वर्षात केलेल्या फॉरेक्स व्यवहाराचे त्यांनी कौतुक करून भविष्यात हबीब अमेरिकन बँकेचे सर्वतोपरी सहकार्य राज्य बँकेस राहील, अशी ग्वाही दिल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे : कात्रज डेअरीच्या अध्यक्षांची सोमवारी निवड; उत्सुकता शिगेला

पुणे : अप्पर गंगा नदीवर ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ मोहीम

WTC Final 2023 : भारताच्या धोरणात्मक चुकांचा ऑस्ट्रेलियाला लाभ

Back to top button